अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका चांगलीच गाजली. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अडीच वर्ष अधिराज्य गाजवलं. याच मालिकेमुळे मराठी सिनेसृष्टीला एक उत्कृष्ट बालकलाकार भेटली ती म्हणजे मायरा वायकुळ. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून मायरा चांगलीच भाव खाऊन गेली. या मालिकेत तिने साकारलेली परी अजूनही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’नंतर मायरा वेगवेगळ्या मालिका, चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारताना दिसत आहे. लवकरच तिचा ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर…’ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यामुळे सध्या मायरा खूप चर्चेत आहे.
संकेत माने दिग्दर्शित ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर…’ चित्रपटात मायरा वायकुळ प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर स्पृहा परब, कल्याणी मुळ्ये, मंगेश देसाई, उषा नाडकर्णी, माधवी जुवेकर, प्रथमेश परब, सविता मालपेकर महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. त्यामुळे सध्या ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर…’ चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मायराने नुकताच ‘मीडिया टॉक मराठी’ या युट्यूब चॅनलेशी संवाद साधला. यावेळी मायराने बॉलीवूडच्या भाईजानबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
मायराला विचारलं की, तू आता बऱ्याच मोठमोठ्या कलाकारांबरोबर काम करते आहेस. नुकतेच तुला सचिन पिळगांवकर भेटले. तर तुला अजून कोणत्या कलाकारांबरोबर काम करायची किंवा त्यांना भेटायची इच्छा आहे? तर मायरा म्हणाली की, हे सांगितलं तर सगळ्यांची फाफलेल. मग तिला विचारलं, “का गं?” मायरा म्हणाली, “सलमान खान. मला तो आणि दीपिका पादुकोण खूप आवडते. मी त्याचे बरेच चित्रपट बघितले आहेत.”
दरम्यान, मायरा वायकुळच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘माझी तुझी रेशीमगाठ’नंतर हिंदी मालिकाविश्वात पदार्पण केलं होतं. ‘कलर्स टीव्ही’वरील ‘नीरजा: एक नयी पहचान’ या मालिकेत ती झळकली होती. या हिंदी मालिकेत मायरा अभिनेत्री स्नेहा वाघबरोबर प्रमुख भूमिकेत दिसली. यानंतर मायराने मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपटात ती पाहायला मिळाली. या चित्रपटात ती मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सारंग साठ्ये, सुकन्या मोने, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत अशा तगड्या कलाकारांबरोबर झळकली. त्यानंतर आता ३१ जानेवारीला मायराचा ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर…’ चित्रपट प्रदर्शित होतं आहे.