‘बिग बॉस १६’चा ग्रँड फिनाले नुकताच संपन्न झाला. पहिल्या दिवसापासूनच हे पर्व या पर्वातील स्पर्धकांमुळे चर्चेत होतं. अखेर ‘बिग बॉस १६’ च्या ट्रॉफीवर पुण्याचा रॅपर एमसी स्टॅन याने नाव कोरलं. तर या पर्वात ‘बिग बॉस मराठी २’चा विजेता मराठमोळा शिव ठाकरे याला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. या पर्वामुळे एमसी स्टॅनचा चहातावर्ग प्रचंड वाढला. त्याची प्रसिद्धी इतकी वाढली की त्याने विराट कोहलीलाही मागे टाकलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिग बॉस १६ ची ट्रॉफी जिंकल्यावर एमसी स्टॅनवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावरून चाहते त्याचं भरभरून कौतुक करत आहेत. बिग बॉस १६ मुळे एमसी स्टॅनला नवी ओळख मिळाली. या कार्यक्रमामुळे त्याच्या फॅन फॉलोइंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामुळे त्याची तुलना विराट कोहलीशी केली जात आहे.

आणखी वाचा : Video: फटाक्यांची आतिषबाजी, ढोल-ताशांचा गजर…; शिव ठाकरेचं अमरावतीत दणक्यात स्वागत, व्हिडीओ व्हायरल

ज्या दिवशी बिग बॉसचं १६ वं पर्व संपलं त्या दिवशी साधारण एकाच वेळी एमसी स्टॅन व विराट कोहली यांनी सोशल मीडियावर दोन वेगवेगळ्या पोस्ट शेअर केल्या. एमसी स्टॅनने त्याचा बिग बॉसची ट्रॉफी घेतलेला फोटो पोस्ट केला तर विराट कोहलीने भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तान संघाविरुद्ध मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचं कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केली. विराट इंस्टाग्रामवर भारतातील सर्वात जास्त फॉलोअर्स असणारा व्यक्ती आहे. त्यामुळे त्याच्या पोस्टला सर्वाधिक लाईक आणि कमेंट्स असतील असं सर्वांना वाटत होतं. मात्र एकाच वेळी टाकलेल्या त्या पोस्टवर विराटला २० लाख लाईक्स होते तर एमसी स्टॅनला ६० लाख लाईक्स होते.

हेही वाचा : ‘बिग बॉस १६’ शिव ठाकरेसाठी ठरलं खास! आता झळकणार सलमान खानच्या चित्रपटात?

त्यांच्या पोस्टचे स्क्रीनशॉट सध्या खूप व्हायरल होत आहेत. आता यावर एमसी स्टॅन आणि विराट कोहली या दोघांचेही चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत. एकीकडे एमसी स्टॅनचे चाहते कमेंट्स करत त्याचं अभिनंदन करत आहेत, दुसरीकडे विराट कोहलीचे चाहते या यावर प्रतिक्रिया देत एमसी स्टॅनची तुलना विराट कोहलीशी करू नका असं म्हणताना दिसत आहेत. आता सोशल मीडियावर विराट कोहलीलाही मागे टाकल्याने एमसी स्टॅन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mc stan beats virat kohli in social media popularity rnv