बिग बॉस १६ चा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. रविवारी रात्री उशीरा बिग बॉसच्या १६ पर्वाचा विजेता घोषित करण्यात आला. मराठमोळ्या शिव ठाकरेला मागे टाकत एमसी स्टॅन या पर्वाचा विजेता झाला. सोशल मीडियावरून एमसी स्टॅनवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. बिग बॉसचं विजेतेपद जिंकल्यानंतर त्याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावेळीचा त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्यात प्रियांका चहर चौधरी, एमसी स्टॅन आणि शिव ठाकरे यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. अखेरच्या क्षणी प्रियांका बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर शिव आणि एमसी स्टॅन यांच्यापैकी कोणतरी एक विजेता होणार असं दिसत होतं आणि यात एमसी स्टॅनने बाजी मारली. त्यानंतर त्याने बिग बॉसच्या घरातील प्रवासावर भाष्य केलं.

आणखी वाचा- “जे व्हायचे ते झालं आणि ट्रॉफी…”, बिग बॉस १६ मधून बाहेर पडल्यानंतर शिव ठाकरेची प्रतिक्रिया

एमसी स्टॅन म्हणाला, “बिग बॉसच्या घरात मी बऱ्या गोष्टी शिकलो. अगोदर मी खूप भावूक व्हायचो पण नंतर एक वेळ अशी आली की मला दुःख सहन करण्याची सवय लागली. छोट्या छोट्या गोष्टींवर रडणं किंवा भावूक होणं बंद झालं. मी बाथरुममध्ये जाऊन एकटाच रडायचो. पण बिग बॉसच्या घरात मी आणखी खंबीर झालो. विशेषतः मी स्पष्टपणे नकार द्यायला शिकलो. जे अगोदर मला जमत नव्हतं. ज्या गोष्टी मला आई-बाबा सांगयचे त्याच गोष्टी मला सलमान भाईनेही सांगितल्या. त्यामुळे मला कोणत्याही गोष्टीचं फार दुःख झालं नाही.”

आणखी वाचा- “नेहमीच खरं वागलो…”, Bigg Boss 16 चा विजेता झाल्यानंतर एमसी स्टॅनची पहिली पोस्ट

दरम्यान विजेतेपद जिंकल्यानंतर इन्स्टाग्रामवरुन एमसी स्टॅन एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमधून त्याने चाहत्यांचे आभार मानले होते. त्याने लिहिलं, “आम्ही इतिहास रचला, नेहमीच खरं वागलो, नॅशनल टीव्हीवर रॅप हिपहॉप केलं. आईचं स्वप्न पूर्ण झालं आणि ट्रॉफी पी-टाऊनमध्ये आली. ज्याने ज्याने प्रेम दिलं त्या प्रत्येकाचा त्यावर हक्क आहे. शेवटपर्यंत एमसी स्टॅन.” अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आणि चाहत्यांचे आभार मानले. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अनेकांनी यावर कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mc stan open up about his bigg boss journey after winning bigg boss 16 mrj