टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय शो असलेल्या ‘बिग बॉस’चा १६ व्या पर्वाची सांगता झाली. पुण्याचा रॅपर एमसी स्टॅन या पर्वाचा विजेता ठरला. प्रियांका चौधरी आणि शिव ठाकरे हे बिग बॉस १६ च्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. पण एमसी स्टॅन विजयी ठरल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर आता एमसी स्टॅनने शिव ठाकरेची माफी मागितल्याचे बोललं जात आहे. त्यामागचे कारणही समोर आले आहे.
‘बिग बॉस १६’ च्या विजेता ठरल्यापासून एमसी स्टॅन हा सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे. नुकतंच ‘बिग बॉस १६’ चा पहिला रनरअप शिव ठाकरेला विजेता एमसी स्टॅनबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. शिव ठाकरेनेही याची खूपच स्पष्टपणे उत्तर दिली. एमसी स्टॅन हा विजेता झाल्यानंतर त्याने माझी माफी मागितली, असे शिव ठाकरेने यावेळी सांगितले.
आणखी वाचा : Bigg Boss 16 Grand Finale : ‘बिग बॉस हिंदी’ १६ व्या पर्वाच्या विजेत्याची घोषणा, पुण्याच्या एमसी स्टॅनने कोरले ट्रॉफीवर नाव
“फराह खानने आयोजित केलेल्या पार्टीत एमसी स्टॅनने मला सॉरी असे म्हटले. त्यावेळी मी त्याची समजूत घातली. यात तुझी काहीही चूक नाही, हे त्याला सांगितले. आता यापुढे तुझे आयुष्य आणखी चांगले होणार आहे.
एमसी स्टॅन हा मनाने अत्यंत चांगला आहे. काहीतरी गडबड झाली आहे, असा विचार त्याला सतत त्रास देत होता. त्यावेळी मी त्याला समजावून सांगितले की काहीही चुकीचे झाले नाही. ज्याचा बिग बॉसच्या ट्रॉफीवर अधिकार होता, त्याच्या हातात आता ती आहे.” असे शिव ठाकरे म्हणाला.
शिव ठाकरे पुढे म्हणाला, “तो बिग बॉसमध्ये असताना नेहमीच मनापासून खेळत राहिला. मनापासून बोललेलं मनापर्यंत पोहोचतं. ज्या गोष्टीवर ज्याचा हक्क आहे त्यालाच ती गोष्ट मिळते. जर तो दोन महिने खेळ समजून घेऊन ट्रॉफी जिंकला असेल तर विचार करा की तो चार महिने गेम खेळला असता तर किती राडे झाले असते. त्याने जे जिंकलं त्यावर त्याचा हक्क होता.”
दरम्यान बिग बॉस १६ च्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये एमसी स्टेन, शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भानोट होते. या पाच जणांमध्ये एमसी स्टॅनला सर्वाधिक मतांनी विजयी ठरला. त्याला बिग बॉसची ट्रॉफी, ३१ लाख आणि गाडी देण्यात आली.