Megha Dhade : २०२५ या वर्षातील जवळपास सर्वच रेकॉर्ड मोडत विकी कौशल आणि रश्मिका मंदान्नाच्या ‘छावा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच मजल मारली. या चित्रपटाने ६०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. प्रदर्शनाच्या पुर्वीपासूनच हा चित्रपट अनेक कारणांनी चर्चेत होता. प्रदर्शनाआधीच प्रेक्षकांचाआ तूफान प्रतिसाद चित्रपटाला मिळाला होता. या चित्रपटामध्ये बॉलीवूडसह मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली आहे. अशातच काही दिवसांपुर्वी मराठी अभिनेता आस्ताद काळेने ‘छावा’बद्दल एक पोस्ट शेअर केली होती. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर दोन महिन्यांनी आस्तादने फेसबुक पोस्ट शेअर करत या चित्रपटातील खटकलेले मुद्दे उपस्थित केले होते.

आस्ताद काळेने ‘छावा’बद्दल केलेल्या पोस्टवर मेघा धाडेची प्रतिक्रिया

“छावा वाईट फिल्म आहे” असं म्हणत आस्तादने पोस्ट शेअर केली होती. नंतर त्याने ती पोस्ट काढूनही टाकली. पण या पोस्टमुळे अभिनेत्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. अशातच आता आस्तादच्या या व्यक्तव्यावर अभिनेत्री मेघा धाडेनी तिची प्रतिक्रिया दिली आहे. मेघाने अमृता फिल्म्स या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तिचं मत व्यक्त केलं. यावेळी तिने तुला खात्री नव्हती तर त्यात तू स्वत:हून काम का केलं?” असा प्रश्नही उपस्थित केला.

“तुला खात्री नव्हती तर त्यात तू स्वत:हून चित्रपटात काम का केलं?”

याबद्दल मेघा असं म्हणाली की, “अभिव्यक्ती व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला असलं तरी मला असं वाटतं की, आस्तादचं म्हणणं मला पटलं नाही. ती फिल्म वाईट आहे आणि इतिहास म्हणून तो चित्रपट चुकीचा आहे असं तो जे बोलला ते मला पटलं नाही. अरे बाबा कोणीतरी इतक्या मोठ्या पातळीवर आपल्या शंभूराजांना, त्यांनी दिलेल्या बलिदानाला सगळ्या जगात पोहोचवत आहे, हा विचार तू का करत नाही. मग मला असं म्हणायचं आहे की, आतापर्यंत त्याने जे चित्रपट केले; ते सगळे चित्रपट चांगले होते का? शंभर टक्के ते चित्रपट खरंच चांगले होते का? बरं तुला खात्री नव्हती तर त्यात तू स्वत:हून काम का केलं?”

“प्रत्येक गोष्ट तांत्रिकरित्या योग्य आहे बघण्याइतकं टीकात्मक होऊ नका”

यापुढे मेघा म्हणाली की, “मला असं वाटतं की, तुम्ही त्या चित्रपटाचा हेतू लक्षात घ्या. कधी कधी काही गोष्टी या काळाची गरज असतात. प्रत्येक गोष्ट तांत्रिकरित्या किती योग्य आहे हे बघण्याइतकं टीकात्मक होऊ नका. काही गोष्टींचा हेतू लक्षात घ्या. आज कितीतरी मुलांना हा इतिहास माहीत नाही. सगळ्यांच्या नशिबात आस्तादच्या बाबांसारखे बाबा नाहीत की, ते त्याला छान इतिहास समजवतील किंवा मराठी सांगू शकतील. त्यामुळे मला वाटतं की, आपल्या अनेक पुढच्या पिढ्या आहेत की, त्यांना त्यांच्या आईवडिलांकडून इतका चांगला ठेवा नाही मिळणार. त्यामुळे अशा पद्धतीने त्यांना काही गोष्टी कळत आहेत किंवा माहीत होत आहेत.”