‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर अलीकडेच ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ नवी मालिका सुरू झाली आहे. या मालिकेत अभिनेत्री शिवानी सुर्वे व अभिनेता समीर परांजपे यांच्यासह अनेक कलाकार पाहायला मिळत आहेत. आता या मालिकेनंतर लवकरच ‘स्टार प्रवाह’वर जुन्या कार्यक्रमाचं नवं पर्व सुरू होणार आहे. ‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद’ या कार्यक्रमाचं तिसरं पर्व प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालं आहे. कालपासून या कार्यक्रमाचे प्रोमो समोर येत आहेत.

सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर शनिवार-रविवार रात्री ९ वाजता ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर १’ हा कार्यक्रम सुरू आहे. पण आता हा कार्यक्रम शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. अभिनेता अंकुश चौधरी, फुलवा खामकर, वैभव घुगे या कार्यक्रमाचे परीक्षक असून अभिनेत्री समुद्धी केळकर सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडत आहे. पण लवकरच ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर १’ महाराष्ट्राला मिळणार असून हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

हेही वाचा – प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने गायलं आहे कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’चं ‘जमूरे’ गाणं! याआधी अजय देवगणच्या चित्रपटात केलेलं काम

‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर १’ची जागा ‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद ३’ हा कार्यक्रम घेणार आहे. १३ जुलैपासून ‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद ३’ कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पुन्हा छोट्यांचे सूर बरसणार असून जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचे जबरदस्त प्रोमो प्रदर्शित झाले आहेत. या प्रोमोमधून कार्यक्रमातील स्पर्धकांची ओळख करून दिली जात आहे. आतापर्यंत पुण्याचा भार्गव जाधव, तेलंगणाची अंजली गडपाळे, संगमनेरचा सारंग भालके या तीन स्पर्धकांची ओळख समोर आली आहे.

हेही वाचा – Video: “कालीन भैय्या गॉन, गुड्डू पंडित ऑन…”, बहुचर्चित ‘मिर्झापूर ३’ सीरिजचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद ३’ या कार्यक्रमाचे परीक्षक बदलले नसून सचिन पिळगांवकर, आदर्श शिंदे आणि वैशाली सामंत असणार आहे. तसंच पहिल्या पर्वाचं सूत्रसंचालन करणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यंदा देखील ही धुरा सांभाळणार आहे. दुसऱ्या पर्वात सूत्रसंचालनाची जबाबदारी वैदेही परशुरामीने पेलली होती. शिवाय तिच्या साथीला बालकलाकार सारा पालेकरही होती. पण आता वैदेही परशुरामीची जागा सिद्धार्थ चांदेकर घेणार आहे. ‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद ३’ १३ जुलैपासून शनिवार-रविवार रात्री ९ वाजता पाहायला मिळणार आहे.