प्रत्येक कलाकार त्याच्या आयुष्यात विविध भूमिका साकारत असतो. कलाकारांना विविध भूमिका साकारत असताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. यामध्ये कधी भावनांचा खेळ तर कधी आरोग्य आणि विविध अडचणी येत असतात. या सर्व अडचणींवर मात करत एक कलाकार रसिक प्रेक्षकांसाठी आपला अभिनय सादर करत असतो. अशात आता अभिनेते मिलिंद गवळी यांनी कलाविश्वातील सकारात्मक आणि नकारात्मक विषयांवर आपलं मत व्यक्त केलं आहे.
मिलिंद गवळी यांनी नुकतीच ‘दिल के करीब’मध्ये मुलाखत दिली. यावेळी त्यांच्याबरोबर पत्नी दीपा गवळीही तेथे उपस्थित होत्या. मुलाखतीमधला एक व्हिडीओ त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यात मिलिंग गवळी यांनी त्यांचा संसार आतापर्यंत इतका छान कसा सुरू आहे यावरही भाष्य केलंय.
मिलिंद गवळी यामध्ये म्हणाले, “एका कलाकाराने एकतर लग्नच करू नये. कारण या श्रेत्रात आपल्या मेंदूवरील संयम काहीवेळा कमी होतो, कारण तुम्ही तुमच्या भावना विकत असता. चित्रपट करत असताना घरी आल्यावर स्वत:ला त्या भूमिकेतून बाहेर काढण्यासाठी ८ ते १० दिवसांचा वेळ मिळायचा. मात्र, रोजच्या मालिकांमध्ये हा पर्याय नाही, त्यामुळे मी जेव्हा अनिरुद्ध देशमुख साकारत असेल तेव्हा घरी अनिरुद्ध देशमुखसुद्धा येऊ शकतो. तो तिथेच सोडून येता येत नाही. कारण लगेच दुसऱ्या दिवशी पुन्हा हीच भूमिका साकारायची असते, त्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी मेडिटेशन, अध्यात्म आणि दीपाच्या अध्यात्मामुळे कुठेतरी आमचा संसार अगदी शांतपणे आणि चांगला सुरू आहे”, असं मिलिंद गवळी म्हणाले.
मिलिंद गवळींनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट करत पुढे मनोरंजन विश्वातील सकारात्मक आणि त्यातल्या नकारात्मक बाजूंवर एक पोस्टही लिहिली आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं, “प्रत्येक क्षेत्राची एक डार्क साईड असते व आपण त्याच्या आत असल्यामुळे ती बाजू आपल्याला दिसत नाही. जोपर्यंत वेगळ्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे आपण बघत नाही तोपर्यंत ती आपल्याला जाणवतसुद्धा नाही. हे प्रत्येक क्षेत्रामध्ये असतं, या कलाक्षेत्रामध्ये ते प्रकर्षाने जाणवतं किंवा दिसतं.”
“मानसिक आरोग्य, मनावरील संयम, भावना एका कलाकाराच्या जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी असतात, ज्या अजिबात दिसत नाहीत. कालांतराने त्या जाणवायला लागतात. बऱ्याच वेळा त्या कलाकाराला नाही पण त्याच्या आजूबाजूच्या लोकांना प्रकर्षाने जाणवतात. आपल्याला ऐकायला मिळतं की तू खूपच बदलला, तू असा नव्हता, तो असा वागेल असं वाटलंच नाही, आपण म्हणतो ना ‘भावनांशी खेळू नका’; ते मानसिक संतुलनासाठी बरोबर नाही, पण एक कलाकार रोज त्याच्या भावनांशीच खेळत असतो आणि कालांतराने त्याचे परिणाम त्याला जाणवायला लागतात”, असं मिलिंद गवळींनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.