‘नवरा माझा नवसाचा’, ‘बिल्लू’, ‘यकीन’, ‘आम्ही सातपुते’, ‘सून लाडकी सासरची’ आणि २०२४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ अशा अनेक मराठीसह हिंदी चित्रपटांत काम करणारे अभिनेते म्हणजेच अतुल परचुरे होय. अतुल परचुरेंचे १४ ऑक्टोबर २०२४ ला दीर्घ आजाराने निधन झाले. आता अभिनेते मिलिंद गवळी यांनी एका मुलाखतीत अतुल परचुरेंच्या आठवणी सांगितल्या आहेत.

मिलिंद गवळींनी सांगितली अतुल परचुरेंची आठवण

मिलिंद गवळींनी नुकतीच ‘लोकशाही मराठी फ्रेंडली’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. ‘सून लाडकी सासरची’ या चित्रपटात अतुल परचुरे व मिलिंद गवळी यांनी एकत्र काम केले आहे. चित्रपटातील एका सीनमध्ये या दोन्ही कलकारांनी स्त्री पात्र साकारल्याचे पाहायला मिळाले. या चित्रपटाच्या शूटिंगची काही आठवण आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना मिलिंद गवळी यांनी म्हटले, “हा चित्रपट खूप चालला. चार थिएटरमध्ये तर रौप्य महोत्सव साजरा झाला होता. चित्रपटाचं शूटिंग पुण्यामध्ये एक ग्वालियर पॅलेस आहे, तिथे झालं. त्या पॅलेसमध्ये आम्ही राहिलो. मी आणि अतुल एकाच खोलीत राहत होतो. पहिलं शेड्युल सलग ४७ दिवसांचं झालं. ४७ दिवस आम्ही एकत्र होतो. त्यामुळे माझी आणि अतुलची खूप छान मैत्री झाली. एक तर तो कलाकार म्हणून वरच्या दर्जाचा, फारच भारी होता. त्यावेळी तो पु. ल. देशपांडेंचं ‘व्यक्ती आणि वल्ली’ हे नाटक करत होता. त्याचं संपूर्ण नाटक तोंडपाठ होतं. गप्पांमध्ये तो नाटकातले संवाद म्हणून दाखवायचा आणि खूप मजा यायची. आम्ही बाहेर जेवायला जायचो, तो टेनिसही उत्तम खेळायचा.”

“चित्रपटातील तो जो सीक्वेस आहे ना, तर दिग्दर्शकांना काहीतरी कॉमेडी पाहिजे होतं. डोहाळजेवणाचा कार्यक्रम जिथे बायकांना बोलावतात, पुरुषांना बोलावत नाहीत. पण मग दिग्दर्शकांना वाटलं की, या दोघांनी तिथे जायचं. पण कसं? तर स्त्रीवेशात जायचं ठरलं. अतुल इतका भन्नाट दिसत होता. तीन-चार दिवस त्या सीनचं शूटिंग सुरू होतं. माझ्या मागे एक लाइटमन लागला होता. तो सतत माझ्याकडे बघत असे, तो माझ्या प्रेमातच पडला होता. तो सतत माझ्या मागे-मागे असायचा. बरं मला काही बोलताही यायचं नाही. मी अतुलला सांगायचो की, मला आता भीती वाटायला लागली आहे. अतुल आणि मी खूप धमाल केली. अतुल फारच गोड होता.”

अतुल परचुरेंबद्दल अधिक बोलताना मिलिंद गवळींनी म्हटले, “मला फारच वाईट वाटतं की, आम्ही त्यानंतर एकत्र कधी काम केलं नाही. आई कुठे काय करते ही मालिका सुरू होती, तेव्हा तो ती मालिका बघायचा. मला फोन करून आवर्जून सांगायचा की, हा सीन चांगला आहे, तो सीन चांगला आहे. जायच्या अगदी दोन महिन्यांआधी मला फोन करून सांगितलं की, आपण एक नाटक करूयात. दोन वडिलांची गोष्ट आहे, तू आणि मी करूया. मी म्हटलं की, अतुल ही मालिका किती दिवस अजून चालेल माहीत नाही आणि मला करता येईल की नाही, मला सांगता येत नाही वगैरे. तर अतुलबरोबरच्या रम्य आठवणी आहेत. माझ्या आणि अतुलच्या तर खूप छान आठवणी आहेत. तो माणूस फार ग्रेट होताच; पण तो मित्र म्हणूनही खूप सच्चा होता.”

हेही वाचा: ‘नवरी मिळे हिटलरला’मधील एजेने शेअर केला लीलाबरोबरचा व्हिडीओ; चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस, म्हणाले, “परफेक्ट जोडी”

मिलिंद गवळी यांच्या कामाबद्दल बोलायचे, तर ते नुकतेच ‘आई कुठे काय करते’ मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकले होते. या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. आता ते कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader