‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून अनिरुद्ध ही भूमिका साकारत मिलिंद गवळी(Milind Gawali) प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मात्र, मिलिंद गवळी वेगवेगळ्या माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. विविध कार्यक्रम, तसेच सोशल मीडिया या माध्यमातून मिलिंद गवळी प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. आता अभिनेते मिलिंद गवळी यांनी ‘छावा’ चित्रपट, तसेच लक्ष्मण उतेकर आणि विकी कौशल यांच्याबद्दल वक्तव्य केले आहे.

“जवळजवळ पाच वर्षं…”

मिलिंद गवळी यांनी ‘स्टार विश्व’ या चॅनेलशी नुकताच संवाद साधला. आई कुठे काय करते या मालिकेबद्दल बोलताना मिलिंद गवळी म्हणाले, “टीमची तर मला आठवण येते. भन्नाट टीम होती. अतिशय हुशार लोकांची टीम होती. सगळे कलाकार अप्रतिम होते. नमिता वर्तक जिने ही गोष्ट लिहिली, ते सगळेच अतिशय हुशार लोक आहेत. जवळजवळ पाच वर्षं इतकं छान काम लोकांपर्यंत पोहोचलं आहे आणि स्टार प्रवाह हे चॅनेल होतं. स्टार प्रवाह हे अतिशय चांगलं चॅनेल आहे, जे कलाकारांना खूप सांभाळतं. म्हणजे कलाकार खूप संवेदनशील असतात. त्यामुळे माझं असं मत आहे की, त्यांना जपणं गरजेचं आहे.”

पुढे मिलिंद गवळी म्हणाले, “लक्ष्मण उतेकर आणि विकी कौशल यांच्या मुलाखती ऐकत होतो. सिनेमा प्रदर्शित झाला, सुपरहिट झाला. तरीही लक्ष्मण उतेकर विकी कौशलला राजे म्हणत होते. त्या कलाकाराला त्या दिग्दर्शकानं राजे म्हणून राजांचा दर्जा दिला. विकी कौशलनं जी भूमिका केली, ती राजांसारखी केली, असं मला वाटतं. त्यामुळे प्रत्येक दिग्दर्शकानं कलाकाराला त्याची संवेदनशीलता ओळखून, मार्गदर्शन करणं गरजेचं आहे, असं वाटतं.”

‘छावा’ चित्रपट हा १४ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. महिन्यानंतरही ‘छावा’ बॉक्स ऑफिसवर कमाल करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केला असून, मॅडॉक कंपनीने चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीवर आधारित आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत असल्याचे पाहायला मिळाले. हा सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षक भारावून गेले होते. ‘छावा’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून, ७०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटात बॉलीवूड अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे. लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. तसेच अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत दिसत आहे. आता सिनेमा लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.

मिलिंद गवळी हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांत काम केले आहे. त्यामध्ये ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’, ‘बेरीज वजाबाकी’, ‘ठण ठण गोपाळ’, ‘अथांग’ अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. नुकतेच ते ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत खलनायकाची भूमिका करताना दिसले होते. अनिरुद्ध हे पात्र त्यांनी साकारले आहे. ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक ठरली. त्यानंतर अभिनेते लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेतही दिसले होते. आता आगामी काळात मिलिंद गवळी कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.