कलाकार हे त्यांच्या चित्रपट-मालिकांतील भूमिकांमुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात. त्याचबरोबर ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील सतत चर्चेत आल्याचे पाहायला मिळते. ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte)फेम लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी हे सध्या चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेने काही दिवसांपूर्वीच निरोप घेतला. त्यानिमित्ताने मालिकेतील कलाकार विविध मुलाखती, सोशल मीडियावरील पोस्ट यांमुळे मोठ्या चर्चेत असल्याचे पाहायला मिळाले. आता अभिनेते मिलिंद गवळी यांनी एका मुलाखतीत कॉलेजमध्ये एका मुलीने लिहिलेल्या प्रेमपत्राचा किस्सा सांगितला आहे.
प्रेमपत्राचा किस्सा सांगत मिलिंद गवळी म्हणाले…
अभिनेते मिलिंद गवळींनी नुकतीच ‘लोकशाही मराठी फ्रेंडली’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत एका मुलीने लिहिलेल्या प्रेमपत्राबद्दल त्यांनी वक्तव्य केले आहे. मिलिंद गवळींनी किस्सा सांगताना म्हटले, “कॉलेजमध्ये द्वितीय वर्षाला असताना एका मुलीनं पत्र लिहिलं होतं आणि ते माझ्या अजूनही चांगलं लक्षात आहे. कारण- तिनं एक डबा दिला होता. डब्यामध्ये तिळाचे लाडू होते आणि एक चिठ्ठी होती. मला म्हणाली की, हे तुमच्यासाठी तिळाचे लाडू आहेत. माझी आणि माझ्या आईची खूप छान मैत्री होती. सगळ्या गोष्टी आईला माहीत असायच्या. त्यामुळे मी घरी तो डबा नेला. ती चिठ्ठी आईला वाचून दाखविली. फार गोड चिठ्ठी होती. त्यामध्ये लिहिलेलं की, मी कधीही कोणालाही, असं लिहिलं नाही. तू मला खूप आवडतोस. मला तुझ्याशी मैत्री करायला आवडेल, असं बरंच काही लिहिलं होतं. खूप गोड असं एक पत्र वहीचं पान फाडून लिहिलेलं असतं, तसं ते होतं. मग आईनं त्याच डब्यामध्ये आणखीन काहीतरी भरून दिलं.”
त्या पत्राचं उत्तर तुम्ही काय दिलं, या प्रश्नावर मिलिंद गवळी म्हणाले, “काय होतं ना, माझं लग्न फार आधी ठरलं होतं. जवळजवळ मी ११वीत असतानाच माझं लग्न ठरलं होतं. त्या मुलीला मी प्रामाणिकपणे सांगितलं की, तू जो विचार करतेयस, तो मी करू शकत नाही. कारण- माझं आधीच लग्न ठरलं आहे. तिला असं वाटलं की, मी खोटं बोलतोय. ती मुलगी अगदी साधी सरळ होती. हे सगळं झाल्यानंतर तीही काही बोलली नाही. मग तिसऱ्या वर्षाच्या शेवटी ती मला भेटली. मी जिना चढून वर जात होतो आणि ती उतरत होती. समोरासमोर आलो. खूप दिवसांनी भेट झाली, कसं आहे, काय वगैरे, असं बोलणं झालं. मी तिला म्हटलं की, अगं, तू टिकली लावली नाहीस. मी टिकली लावायचं सोडलं. मी म्हटलं का? तर ती म्हणाली की, मी त्या दिवसापासून कधीच टिकली लावली नाही. मी म्हटलं की, अगं असं वेड्यासारखं करू नकोस. तर तो किस्सा मी कधी विसरत नाही.”
दरम्यान, मिलिंद गवळी हे अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरदेखील सक्रिय असल्याचे दिसतात. त्यांनी ज्या चित्रपटांत काम केले आहे, ते त्या चित्रपटांच्या शूटिंगचे किस्से सांगताना दिसतात. प्रेक्षकांचादेखील त्यांच्या पोस्टला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो. आता आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेनंतर ते कोणत्या कलाकृतीमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.