‘लग्नानंतर होईलच प्रेम’ (Lagnanantar Hoilach Prem) या मालिकेत ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळाले. पार्थ व नंदिनीच्या लग्नात मोठे संकट निर्माण झाले आहे. नंदिनीचे अपहरण केले आहे. त्यानंतर तिची सगळीकडे शोधाशोध सुरू झाली आहे. मात्र, तिचा शोध लागत नसल्यामुळे गावकरी पार्थचे लग्न दुसऱ्या कोणा मुलीबरोबर लावून देण्यासाठी सांगतात. गावात मान असणारे माजी कल्याण मंत्री यशवंतराव भोसले नंदिनीच्या जागी तिची लहान बहीण काव्या व पार्थचे लग्न लावून देण्याचे सुचवतात. असे केले नाही तर गावकऱ्यांचा संताप अनावर होईल असेही बजावतात. मालिकेतील यशवंतराव ही माजी कल्याण मंत्र्याची भूमिका अभिनेते मिलिंद गवळी(Milind Gawali) यांनी साकारली आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेनंतर या मालिकेत एक वेगळी भूमिका साकारण्याचा अनुभव कसा होता, यावर त्यांनी वक्तव्य केले आहे.

मिलिंद गवळी काय म्हणाले?

मिलिंद गवळी यांनी ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेच्या सेटवरील काही फोटो शेअर करीत लिहिले, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मध्ये यशवंतराव भोसले या भूमिकेचे शूटिंग संपवून घरी आलो. सलग पाच-सहा दिवस मीरा रोडच्या एका भव्य दिव्य मोनार्क स्टुडिओमध्ये या मालिकेचं शूटिंग मी केलं.अचानक एका वेगळ्या विश्वात गेल्यासारखं वाटलं. गेली पाच वर्ष ‘आई कुठे काय करते’ या स्टार प्रवाहवरील मालिकेमध्ये अनिरुद्ध देशमुख ही भूमिका जगत होतो आणि ती भूमिका अंगवळणी पडली होती. गेल्या पाच वर्षांमध्ये एक ‘टाटा टी’ची जाहिरात व काही इव्हेंट सोडले तर मी सातत्याने अनिरुद्धच साकारत होतो. काही महिन्यांपूर्वीच मालिका संपली, त्यामुळे स्वतःसाठी, घरच्यांसाठी, मित्रमंडळी, नातेवाईकांसाठी वेळ देत होतो.

अचानक शशांक सोळंकी जो मराठी मालिका विश्वातला मोठा निर्माता आहे. जो माझ्या कॉलेजमधला वर्गमित्रसुद्धा आहे, त्याने मला त्याच्या लोकप्रिय मालिकेमध्ये म्हणजेच ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मध्ये पाहुणा कलाकार म्हणून एक महत्त्वपूर्ण भूमिका करण्यासाठी विचारलं. स्टार प्रवाहनेसुद्धा त्या गोष्टीला दुजोरा दिला आणि मी उत्साहामध्ये या मालिकेच्या सेटवर पोहोचलो. माजी कल्याण मंत्री यशवंतराव भोसले ही भूमिका मला साकारायला मिळाली. सलग सहा दिवस या यशवंतराव भोसलेच्या भूमिकेमध्ये होतो आणि आताच ती भूमिका संपवून घरी आलो.

“मला फारच भारी वाटत आहे, एका छोट्याशा कालावधीमध्ये मनाला समाधान देणारी अशी भूमिका मला साकारायला मिळाल्याचा एक वेगळा आनंद होत आहे. स्टार प्रवाहवरच्या ‘आई कुठे काय करते’ या अतिशय गाजलेल्या मालिकेनंतर मला पुन्हा स्टार प्रवाहवर काम करायला मिळालं याचापण आनंद वेगळा आहे. आपण ज्यांच्याबरोबर काम करतो, ते काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पुन्हा काम करण्यासाठी बोलावणं येतं, त्या गोष्टीचं समाधान वेगळंच असतं. मालिका निर्माता शशांक सोळंकी जो माझा वर्गमित्र आहे, एकाच बाकावर आम्ही कॉलेजमध्ये बसायचो. दोघांना बुद्धिबळ खेळाची अतिशय आवड, कॉलेजच्या लायब्ररीमध्ये आम्ही दोघं बुद्धिबळ खेळत असू. एकमेकांच्या घरी येणं जाणं, वर्गमित्र निर्माता आणि त्याच्या मालिकेमध्ये आपण काम करतो आहे, या गोष्टीचाही आनंद आणि समाधान हे मनाला सुखावणारं आहे.”

“‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञान माझ्यासाठी तसे अनोळखी होते. काही मोजके कलाकार सोडले तर सगळ्यांबरोबर पहिल्यांदाच काम करत होतो. फक्त अविनाश नारकर, जान्हवीताई पणशीकर यांच्याबरोबरच आधी मी काम केलं होतं. पण, सेटवर गेल्यानंतर मला मी त्यांच्या या कुटुंबात नवीन आहे किंवा एक पाहुणा आहे असं अजिबात वाटलं नाही. दिग्दर्शक भरत गायकवाड यांच्याबरोबर काम करून समाधान वाटलं, खूपच मजा आली”, असे म्हणत मिलिंद गवळी यांनी त्यांचा अनुभव सांगितला आहे. पाहुण्या कलाकाराची भूमिका असली तरी समाधानकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मिलिंद गवळी यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने काही महिन्यांपूर्वीच निरोप घेतला आहे. यामध्ये मधुराणी प्रभुलकर, रूपाली भोसले प्रमुख भूमिकेत काम करताना दिसल्या होत्या. मिलिंद गवळी अभिनयाबरोबरच सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांच्या संपर्कात असतात. शूटिंगदरम्यानच्या अनेक किस्से ते शेअर करताना दिसतात.

Story img Loader