मराठी सिनेविश्वात अभिनेते मिलिंद गवळी यांनी त्यांच्या अभिनयाने मोठं यश कमावलं आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने त्यांना आणखी जास्त प्रसिद्धी मिळवून दिली. या मालिकेत त्यांनी अनिरुद्ध हे पात्र साकारलं होतं. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिकेत अनिरुद्धचा स्वभाव अगदी तापट दाखवण्यात आला होता. तसेच त्याने अरुंधतीची फसवणूक केली होती. या सर्वांत अनिरुद्ध त्याच्या खऱ्या आयुष्यात पत्नीबरोबर कसा वागतो हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये नेहमीच आहे. अशात अभिनेते मिलिंद गवळी यांनी स्वत: त्यांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीचा लग्नावेळीचा एक किस्सा सांगितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिलिंद गवळी आणि त्यांच्या पत्नी दीपा गवळी नुकतेच सुलेखा तळवलकरच्या ‘दिल के करीब’ या शोमध्ये पोहचले होते. त्यावेळी मिलिंद गवळी यांनी सुलेखा आणि त्यांच्या लग्नाचा किस्सा तसेच त्यांची केव्हापासून ओळख होती याची माहिती सांगितली आहे. मिलिंद गवळी म्हणाले, “लग्नाच्या नऊ वर्षे आधीपासून आम्ही एकमेकांना फार चांगले ओळखत होतो. कॉलेजमध्ये गेल्यापासूनच आमची मैत्री होती. त्यावेळी ती मला अरे… तुरे.. असं करून बोलायची. मिलिंद अशीच हाक मारायची, त्यामुळे ती मला अरे… तुरे.. करते याची मला सवय होती. लग्न झालं आणि सात फेरे झाले, जेवायला जायचं म्हणून मी पुढे चालू लागलो; ती मागे होती आणि तिने पहिल्यांदा मला आहो अशी हाक मारली.”

मी मागे वळून पाहिलं नाही

“तिने मारलेली हाक मला ऐकू आली पण मला काही कळालं नाही, त्यामुळे तिने पुन्हा आहो अशी हाक मारली. मी तिच्या जवळ गेलो आणि म्हणालो हे काय नवीन, तू मला आहो आहो म्हणत आहेस; त्यावेळी ती म्हणाली, आजपासून मी तुम्हाला आहो असंच म्हणणार”, असं मिलिंद गवळींनी सांगितलं.

हे नवीन काही सुरू करू नको…

पत्नीने आहो अशी हाक मारल्यावर मिलिंद गवळींनी पुढे सांगितलं, “मी तिला म्हणालो हे नवीन काही सुरू करू नको, तू मला आहो अशी हाक मारू नकोस. तू आहो म्हटलीस तरी मी काही मागे वळून पाहणार नाही. त्यावर ती म्हणाली, मला आईने सांगितलं आहे आता तो तुझा नवरा आहे, तुमचं लग्न झालं आहे, त्यामुळे त्याला आहो अशीच हाक मारायची. अनेक वर्षे तिने आहो म्हटलं की मी त्यावर प्रतिक्रियाच देत नव्हतो.”

मिलिंद गवळी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. ते त्यांच्या आयुष्यातील विविध अपडेट्स चाहत्यांबरोबर शेअर करतात. त्यासह खासगी आयुष्यातील काही गोष्टीसुद्धा ते चाहत्यांबरोबर शेअर करतात. मिलिंद गवळी यांनी चित्रपट आणि मालिका विश्वातून मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेआधी त्यांनी ‘सारे तुझ्याचसाठी’ या मालिकेत मनीष खंडेलवाल हे पात्र साकारलं होतं. ‘तू अशी जवळी रहा’, ‘मुंबई पोलीस’, ‘आम्ही दोघे राजा राणी’ अशा विविध मालिकांमध्ये त्यांनी आजवर काम केलं आहे.