‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेता गुरुचरण सिंग जवळपास दोन आठवड्यांपासून बेपत्ता आहे. तो २२ एप्रिलपासून बेपत्ता आहे व त्याच्या वडिलांनी २६ एप्रिलला पोलिसांत तक्रार दिली होती. गेले १० दिवस पोलीस त्याचा शोध घेत आहेत, पण त्याच्याबद्दल अद्याप काहीच माहिती मिळालेली नाही. आता त्याचे वडील हरगीत सिंग यांनी त्यांचा मुलगा अद्याप सापडला नसल्याने चिंता व्यक्त केली आहे.
गुरुचरणचं अचानक अशा रितीने बेपत्ता होणं कुटुंबियांसाठी खूप धक्कादायक असल्याचं हरगीत सिंग टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाले. ही परिस्थिती कशी हाताळायची हे आपल्याला कळत नसल्याचं त्यांनी नमूद केलं. “आम्ही सगळे खूप चिंतेत आहोत आणि पोलिसांकडून गुरुचरणची काही अपडेट मिळेल, याची वाट पाहत आहोत. आम्ही त्याच्या परत येण्याची वाट पाहत आहोत,” असं हरगीत सिंग म्हणाले.
गुरुचरण सिंगने स्वतःच रचलाय बेपत्ता होण्याचा बनाव? त्याचा फोन नेमका कुठेय? समोर आली माहिती
गुरुचरणची बेपत्ता होण्याआधीची शेवटची पोस्ट ही त्याच्या वडिलांबद्दल होती. त्याने वडिलांच्या वाढदिवसानिमित्त काही फोटोंची एक रील पोस्ट केली होती आणि कॅप्शनमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यादिवसाची आठवण सांगत हरगीत म्हणाले, “आम्ही त्यादिवशी सेलिब्रेशन केलं नव्हतं. सर्वांनी घरातच वेळ घालवला होता.”
गुरुचरण सिंग २२ एप्रिल रोजी घरातून दिल्ली विमानतळावर जाण्यासाठी निघाला. तो मुंबईला जाणार होता, पण मुंबईला पोहोचलाच नाही व घरीही परतला नाही. तीन दिवस त्याच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्याच्या वडिलांनी दिल्लीतील पालम पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी अभिनेत्याचा शोध सुरू केला.
बेपत्ता गुरुचरण सिंगचं लग्न अन् आर्थिक अडचणींबाबत कुटुंबियांनी सोडलं मौन, म्हणाले…
गुरुचरण सिंग दिल्लीतील अनेक भागात पाठीवर बॅग घेऊन चालत फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. पोलिसांनी गुरुचरणच्या मोबाईल डिटेल्स तपासल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुचरण २४ एप्रिलपर्यंत दिल्लीतच होता, यानंतर त्याचा मोबाईल बंद झाला. २४ तारखेला तो पालम येथील त्याच्या घरापासून फक्त दोन ते तीन किलोमीटर अंतरावर होता. त्याने जवळच्याच एटीएममधून सात हजार रुपये काढले होते.
दरम्यान, गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्यावर तो लवकरच लग्न करणार आहे आणि आर्थिक अडचणीत आहे, अशा बातम्या समोर आल्या होत्या. यासंदर्भात ‘द इंडियन एक्सप्रेस’ने त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधला होता. तेव्हा आपल्याला त्याच्या लग्नाच्या चर्चांबद्दल काहीच माहिती नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. आतापर्यंत कोणतीच माहिती न मिळाल्याने गुरुचरणने स्वतःच बेपत्ता होण्याचा बनाव रचून दिल्ली सोडल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला होता.