‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेता गुरुचरण सिंग २२ एप्रिलपासून बेपत्ता आहे. २६ एप्रिलला अभिनेत्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली होती, तेव्हापासून त्याचा शोध सुरू आहे, पण अद्याप त्याच्याबद्दल काहीच कळू शकलेलं नाही. या तपासादरम्यान महत्त्वाची माहिती समोर येत आहे. गुरुचरण आर्थिक व्यवहारांसाठी अनेक बँक खाती वापरत होता, आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही त्याने अनेक क्रेडिट कार्डचा वापर केला होता आणि मग तो अचानक बेपत्ता झाला, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
गुरुचरण सिंग २२ एप्रिलला मुंबईला जाणार होता. तो दिल्लीतील पालम येथील घरातून विमानतळावर जाण्यासाठी निघाला, पण तो पोहोचलाच नाही. गुरुचरणची भक्ती सोनी नावाची मैत्रीण त्याला मुंबई विमानतळावर घ्यायला गेली होती, पण अभिनेता मुंबईला आलाच नाही. तिने एअरपोर्टवर चौकशी केल्यावर तो विमानात बसलाच नसल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर तिने गुरुचरणच्या काही मित्रांना सांगितलं आणि त्यांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला.
तो बेपत्ता झाल्याची तक्रार त्याचे वडील हरगीत सिंग यांनी चार दिवसांनंतर २६ एप्रिलला दिली. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ५० वर्षीय अभिनेत्याचा शोध सुरु केला. या प्रकरणात आता पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. गुरुचरण सिंग १० हून जास्त बँक खाती वापरत होता, असं पोलिसांना तपासात आढळलं आहे. आर्थिक परिस्थिती वाईट असूनही तो इतकी खाती सांभाळत होता, असं पोलीस सूत्रांच्या हवाल्याने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने वृत्त दिलं आहे.
गुरुचरणने रोख रक्कम काढण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर केला आणि एका कार्डचे बाकी असलेले बिल दुसऱ्या कार्डने भरले. त्याने शेवटचे १४ हजार रुपये एटीएममधून काढले होते, त्यानंतर त्याच्याबाबत जास्त माहिती मिळू शकलेली नाही, असंही सूत्रांनी सांगितलं आहे. सुरुवातीच्या तपासादरम्यान पोलिसांनी गुरुचरणबद्दल त्याच्या ओळखीच्या लोकांची व नातेवाईकांनी चौकशी केली. त्यात समोर आलेल्या माहितीनुसार गुरुचरण जास्त आध्यात्मिक झाला होता आणि त्याने पर्वतांवर जाण्याचा उल्लेख केला होता.
बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी
गुरुचरणचं अचानक अशा रितीने बेपत्ता होणं कुटुंबियांसाठी खूप धक्कादायक असल्याचं गुरुचरणचे वडील हरगीत सिंग टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाले. ही परिस्थिती कशी हाताळायची हे आपल्याला कळत नसल्याचं त्यांनी नमूद केलं. “आम्ही सगळे खूप चिंतेत आहोत आणि पोलिसांकडून गुरुचरणची काही अपडेट मिळेल, याची वाट पाहत आहोत. आम्ही त्याच्या परत येण्याची वाट पाहत आहोत,” असं हरगीत सिंग म्हणाले.