‘द केरला स्टोरी’ चित्रपट गेल्या काही दिवसांपासून अनेक कारणांमुळे चर्चेत आहेत. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावरुन अनेक आरोप प्रत्यारोपही सुरू आहेत. लव्हजिहादच्या जाळ्यात अडकून दहशतवादी संघटनेत सामील झालेल्या मुलींच्या सत्यघटनेवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. अनेक सेलिब्रिटी व राजकीय नेत्यांनीही ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाबाबत मत व्यक्त केलं आहे. आता राज ठाकरे यांनी चित्रपटाबाबत त्यांची भूमिका मांडली आहे.
अवधूत गुप्तेच्या आगामी खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात राज ठाकरे हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमातील राज ठाकरेंचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात राज ठाकरेंनी ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाबाबत भाष्य केलं. ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावर पश्चिम बंगाल राज्यात बंदी घालण्यात आली होती. याबाबत राज ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला.
“द केरला स्टोरी चित्रपटावर पश्चिम बंगालमध्ये बंदी घालण्यात आली. चित्रपटावर बंदी आणणे या विषयावर तुमचं काय मत आहे,” असा प्रश्न अवधूत गुप्तेने राज ठाकरेंना विचारला. यावर उत्तर देत राज ठाकरे म्हणाले, “लोकशाहीत राहतो, हे आपण फक्त म्हणतो. तुमच्या झेंडा चित्रपटात माझं व्यक्तिमत्त्व थोडं नकारात्मक दाखविण्यात आलं, असं मी ऐकलं. मी अजूनही तो चित्रपट पाहिलेला नाही. पण मी त्यावर कधीच आक्षेप घेतला नाही.”
हेही वाचा>> IPL फायनलमध्ये स्पंजने सुकवलं मैदान, बॉलिवूड अभिनेत्याचं खोचक ट्वीट, म्हणाला, “बीसीसीआय श्रीमंत असूनही…”
राज ठाकरेंनी झेंडा चित्रपटाबाबत बोलताच अवधूत गुप्तेने तेव्हाचा एक प्रसंग शेअर केला. अवधूत गुप्ते म्हणाला, “झेंडा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या अगोदर मनसेच्या काही नेत्यांनी मला फोन केले होते. मी तेव्हा राज साहेबांना भेटायला गेलो. तुमचे काही कार्यकर्ते, नेते माझा चित्रपट बंद पाडतील, असं मी त्यांना सांगितलं. आमच्यात तासभर चर्चा झाली. त्यानंतर जाताना त्यांनी मला सांगितलं, मनसेकडून तुमच्या चित्रपटाला विरोध होणार नाही. भारतीय सेन्सॉर बोर्ड चित्रपटाला प्रदर्शित करण्यासाठी परवानगी देत असेल, तर मी कोण? तुम्ही चित्रपट प्रदर्शित करा, असं त्यांनी मला सांगितलं.”