‘ठरलं तर मग’फेम अभिनेत्री मोनिका दबडे(Monika Dabade)च्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. तिच्या या कार्यक्रमाला मालिकेतील तिच्या सहकलाकारांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. सर्व सहकलाकार अभिनेत्रीनेच्या डोहाळजेवणाच्या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले होते. आता सेलिब्रिटी कट्टा या चॅनेलने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमात बोलताना अभिनेत्रीने सहकलाकारांचे आभार मानले. तसेच, ती सहकलाकारांच्या प्रेमाने भारावून गेल्याचे म्हटले आहे.
काय म्हणाली अभिनेत्री?
मोनिकाने म्हटले, “हे होणार की नाही हे माहीत नव्हतं. कल्पना होती की, डोहाळेजेवण असतं. मी असं ठरवलेलं की, मला काही डोहाळेजेवण करायचं नाही, मी बारसं करणार नाही. मी काही करणार नाही. कारण- हे करण्यासाठी कोणीतरी लागतं. माझी लक्ष्मी आहे, देव आहे जे बघतोय म्हणून तुम्हा सगळ्यांना सुचलं आणि तुम्ही ते केलं. आतापर्यंत हे माझ्यादेखत इंडस्ट्रीमध्ये कधीच झालं नाही, मी कुठेही बघितलं नाही. आपली मालिका का नंबर वन आहे, तर हे कारण आहे. आपण सगळे कायम एकमेकांसाठी आहोत. मला माहीत नाही, लोकांना बनावटी वाटेल, पण काहीही असू शकतं.” पुढे अभिनेत्रीने म्हटले की, मला मालिकेत काम कऱण्याची संधी मिळाली यासाठी मी कायम कृतज्ञ आहे. यावेळी अभिनेत्री भावूक झाल्याचे दिसले.
याबरोबरच मोनिका व तिचा पती चिन्मय या दोघांनीही डोहाळजेवणात सुंदर उखाणा घेतला. चिन्मयने म्हटले, “मोनिकाच्या डोहाळजेवणाला कौतुकाने जमली मंडळी सारी, मोनिकाचं नाव घेतो, घास भरवतो श्रीखंड आणि पुरी.” तर मोनिकाने, “चिन्मयरावांच्या हातची खाल्ली श्रीखंड पुरी, अशीच आयुष्यभर साथ दे, ठेवू नको दुरी”, असा उखाणा घेतला. मोनिकाचे डोहाळजेवण ती सध्या ज्या मालिकेत काम करते, त्या ठरलं तर मग या मालिकेच्या सेटवर पार पडले. त्यामध्ये तिचे सर्व सहकलाकार आनंदाने सहभागी झाले होते. अभिनेत्री जुई गडकरीपासून सुचित्रा बांदेकर या सर्वांनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती.
दरम्यान, ठरलं तर मग या मालिकेत मोनिका अस्मिता या भूमिकेत काम करताना दिसते. त्यामध्ये अभिनेत्री जुई गडकरी व अमित भानुशाली हे कलाकार सायली व अर्जुन या प्रमुख भूमिकांत दिसत आहेत. मालिकेबरोबर अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चाहत्यांच्या भेटीला येते.