Mothers Day: विनोदाचा बादशाह अभिनेता कुशल बद्रिके आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतोय. मराठी चित्रपट, मालिका, कॉमेडी शो यांद्वारे कुशल घराघरांत लोकप्रिय झाला. कुशलचा मोठा चाहतावर्ग आहे. मराठी सिनेसृष्टीत अनेक वर्षं प्रेक्षकांना खळखळून हसवल्यानंतर कुशल आता भारतभर सगळ्यांचं मनोरंजन करतोय. सोनी टीव्हीवरील ‘मॅडनेस मचायेंगे’ या कॉमेडी शोमध्ये कुशल सध्या आपलं विनोदी कौशल्य दाखवतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज मातृ दिनानिमित्त ‘मॅडनेस मचायेंगे’च्या सेटवर कुशलला एक खास सरप्राईज देण्यात आलं. या सरप्राईजचा व्हिडीओ सोशल मीडियावर त्यानं शेअर केला आहे. कुशलनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मातृदिनानिमित्त आईचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत त्यानं लिहिलं, “आपलं वय कितीही वाढलं तरी आईच्या डोळ्यांत ‘आपलं बालपण’ कायम तरंगताना दिसतं. ‘मातृत्व दिना’च्या निमित्तानं आमच्या ‘मॅडनेस मचायेंगे’ या कार्यक्रमात, आम्हाला सरप्राईज दिलं गेलं. त्यातला माझ्या आईचा हा व्हिडीओ. सर्वांना मातृदिनाच्या शुभेच्छा.”

हेही वाचा… “बाबा आता असता तर…”, सखी गोखलेने व्यक्त केल्या वडिलांबद्दलच्या भावना, म्हणाली…

कुशलनं शेअर केलेल्या या व्हिडीओत अभिनेत्याची आई म्हणाली, “कुशलच्या बालपणीच्या आठवणी मी काय काय सांगू तुम्हाला. खूप आठवणी आहेत त्याच्या. कुशल लहानपणी खूप मस्ती करायचा म्हणून मग मोठा भाऊ त्याला मारायचा. मग तो त्याच्या पप्पांजवळ जायचा आणि सांगायचा की मोठ्या भावानं मला मारलं. तर त्याचे बाबा त्याला म्हणायचे की, मोठ्या भावाला हात नाही लावायचा. मग तो लहान बहिणीला मारून यायचा आणि मग त्याची लहान बहीण येऊन मला बोलायची की, आई बघ दादा मला मारतोय. मग मी त्याला विचारायची की, तू तिला का मारलंस? त्यावर कुशल उत्तर द्यायचा आणि म्हणायचा की, मोठ्या भावावर हात उगारू शकत नाही म्हणून मग मी लहान बहिणीला मारलं.”

कुशलची आई पुढे म्हणाली, “कुशलनं खूप परिश्रम घेतले आहेत. तो एवढा मोठा अभिनेता झाला. नावलौकिक मिळविला त्यानं. ज्यावेळी मी बाजारात जाते तेव्हा लोक बोलतात की, ही कुशलची आई आहे. मला खूप अभिमान वाटतो कुशलबद्दल. मला त्याला एवढंच सांगायचंय की, कुशल जगभर तू नाव कमवावं हीच माझी त्याच्याकडून अपेक्षा आहे.”

हेही वाचा… ‘बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो

दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमात १० वर्षं प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर कुशलनं आता ‘मॅडनेस मचायेंगे’ या कॉमेडी शोमध्ये एन्ट्री केली आहे. या शोमध्ये कुशलबरोबर मराठमोळी हेमांगी कवी आणि फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणून ओळखला जाणारा गौरव मोरेदेखील आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mothers day surprise to kushal badrike on madness machayenge set dvr