Mrinal Kulkarni : मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वाची ‘सोनपरी’ म्हणून अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना ओळखलं जातं. गेली वर्षानुवर्षे नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आजवरचा सिनेविश्वातील प्रवास मृणाल कुलकर्णींनी नुकत्याच ‘आरपारला’ दिलेल्या मुलाखतीत उलगडला आहे. याशिवाय करिअरकडे लक्ष देऊन वैयक्तिक आयुष्य कसं सांभाळलं याबद्दल देखील अभिनेत्रीने या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

मृणाल कुलकर्णी यांच्या एकुलत्या एक मुलाचं नाव विराजस कुलकर्णी असं आहे. लेकाचा जन्म झाल्यावर अभिनेत्रीच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळून त्यांना बरीच कामं मिळत गेली. यावेळी त्यांचे पती रुचिर कुलकर्णी व सासूबाईंनी त्यांना खंबीरपणे साथ दिली. सासरच्या लोकांच्या पाठिंब्यामुळे मी इंडस्ट्रीत एवढं काम करू शकले असं अभिनेत्रीने यावेळी सांगितलं.

यानंतर, “त्या स्वत: एक सासूबाई म्हणून कशा आहेत, त्यांचं आणि शिवानीचं नातं नेमकं कसं आहे?” असा प्रश्न अभिनेत्रीला विचारण्यात आला. यावर मृणाल कुलकर्णी यांनी दिलेलं उत्तर वाचून कोणीही म्हणेल ‘सासू असावी तर अशी’! त्या नेमकं काय म्हणाल्या आहेत जाणून घेऊयात…

शिवानी रांगोळेबद्दल सांगताना मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, “मी सासूबाई झालेच नाहीये कारण, फक्त विराजसचं लग्न झालेलं आहे. विराजसच्या थिएटर संस्थेची शिवानी आधीपासून सभासद होती. त्याच्या पहिल्या नाटकात शिवानीने काम केलं होतं. याशिवाय आम्ही दोघींनी सुद्धा एकत्र काम केलेलं आहे. त्यामुळे मी तिच्यासाठी अजूनही ‘मृणाल ताई’ आहे आणि यामुळेच मला अजिबात तिची सासू वगैरे झाल्यासारखं वाटत नाही.”

अभिनेत्री पुढे म्हणाल्या, “शिवानी मला अजूनही ताई अशी हाक मारते. विराजस माझा एकुलता एक मुलगा…आपल्याला मुलगी नाही याचं थोडं वाईट वाटायचं. मग, माझ्या घरात शिवानी मुलीच्या रुपात आली. प्रचंड हुशार आहे, तिलाही वाचनाची आवड आहे, उत्तम कविता करते आणि अशी मुलगी माझ्या घरी आलीये याचा मला खूप आनंद आहे. त्यामुळे आम्ही एकत्र खूप छान वावरतो, मजा करतो.”

“मला आणि रुचिरला आम्हा दोघांनाही तिचा प्रचंड अभिमान आहे. कारण, ती एक उत्तम अभिनेत्री आहे. जसं विराजसला यश मिळावं अशी आमची इच्छा असते अगदी त्याचप्रमाणे आमच्या शिवानीला भरपूर यश मिळावं, तिला हवं ते काम मिळावं, हवे तेवढे दिवस काम करता यावं अशी आमची इच्छा आहे. आता ती आमची मुलगी आहे. तिच्या रुपात एक गुणी मुलगी आमच्या घरी आलीये आणि तिचा आम्हाला दोघांनाही कायम अभिमान आहे.” असं मृणाल कुलकर्णी यांनी सांगितलं.