अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी हे मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय जोडपं. गेल्या वर्षी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर त्यांनी लग्नगाठ बांधली. गेली अनेक वर्ष शिवानी आणि विराजस यांची मैत्री असल्याने विराजसच्या कुटुंबियांशीही शिवानीचे लग्नाआधीच खूप छान बॉण्डिंग तयार झाले. शिवानी ही मृणाल कुलकर्णी यांची अत्यंत लाडकी आहे. आज शिवानीच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी त्यांच्या लाडक्या सूनेसाठी खास पोस्ट लिहिली आहे.
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे ही मराठी मनोरंजन सृष्टीतील सासू-सूनेची लोकप्रिय जोडी आहे. अनेक कार्यक्रमांना त्या दोघी एकत्र हजेरी लावताना दिसतात. याबरोबरच सोशल मीडियावरून देखील त्या एकमेकींबद्दल त्यांना वाटणारं प्रेम अनेकदा व्यक्त करत असतात. तर आज शिवानीच्या वाढदिवसानिमित्त मृणाल कुलकर्णी यांनी एक पोस्ट लिहित त्यांच्या मनातली एक इच्छा व्यक्त केली आहे.
त्यांनी सोशल मीडियावर शिवानीचा एक फोटो शेअर करत लिहिलं, “सूनबाई, कम सून !! प्रिय शिवानी, तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा ! गेले २-३ महिने अविरत कष्ट करते आहेस .. तेही हसतमुखाने… न दमता-न कंटाळता ! “तुला शिकविन चांगलाच धडा” मालिकेतली अक्षरा उर्फ मास्तरीन बाई म्हणून अमाप लोकप्रिय झाली आहेस. आम्हाला तुझ्या यशाचा खूप आनंद आहे. अभिमान आहे ! अशीच यशस्वी हो.. तुझी सारी स्वप्नं पूर्ण होऊ देत ! आनंदी रहा ! खूप खूप प्रेम ! (ता. क.- पण सून, come soon g ! Miss you! तुझे लाड कधी करायचे आम्ही?)
दरम्यान, शिवानी सध्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या शूटिंगच्या निमित्ताने ती घरापासून लांब राहत आहे. या मालिकेतील तिच्या कामाचं प्रेक्षकांकडून खूप कौतुक होतं. तर आता मृणाल कुलकर्णी यांच्या पोस्टवर कमेंट करत सर्वजण शिवानीवर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.