‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. जवळपास चार वर्षांच्या ब्रेकनंतर लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानिसने या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. तिच्यासह या मालिकेत ज्ञानदा रामतीर्थकर ( काव्या ), विवेक सांगळे ( जिवा ) आणि विजय आंदळकर ( पार्थ ) यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या मालिकेचं कथानक काहीसं वेगळं आहे.
मालिकेत सर्वात आधी नंदिनी आणि पार्थ यांचं लग्न ठरलेलं असतं तर, जिवा-काव्याचं एकमेकांवर खूप प्रेम असतं. मात्र, या चौघांच्या नशीबाचं चक्र असं काही फिरतं की, ऐन लग्नाच्या दिवशी मालिकेत काव्या-पार्थ आणि नंदिनी-जिवा यांचा लग्नसोहळा पाहायला मिळतो. अर्थात, हे लग्न चौघांच्याही मनाविरुद्ध झालेलं आहे. पण, मालिकेतील हा भयंकर ट्विस्ट सध्या सर्वत्र चर्चेत आला आहे.
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील या सर्वात मोठ्या ट्विस्टचं जवळपास महिनाभर शूट करण्यात आलं होतं. सेटवर मृणाल आणि ज्ञानदा २२ दिवस लग्नातील साज-शृंगार करून तयार होऊन बसायच्या. २२ दिवस भरजरी पोशाख आणि मेकअप करून भावनिक सीन कसे शूट केले याबद्दल या मालिकेतील मुख्य अभिनेत्रींनी ‘अल्ट्रा बझ मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. या दोघी नेमकं काय म्हणाल्या आहेत जाणून घेऊयात…
२२ दिवस एकाच पोशाखात सीन करणं खूप कठीण असतं याबद्दल सांगताना ज्ञानदा रामतीर्थकर ( काव्या ) म्हणाली, “भावनिकदृष्ट्या ते आमच्यासाठी खूप कठीण सीन्स होते. कारण, मालिकेत काव्या, पार्थ, जिवा, नंदिनी या चौघांचेही खूप विरोधी स्वभाव आहेत. पण, ऑफस्क्रीन आम्ही सगळ्यांनी एकमेकांना खूप चांगली मदत केली. संपूर्ण टीमचा आम्हाला पाठिंबा मिळाला… २२ दिवस लागले…आम्ही दोघी ऑफस्क्रीन एकमेकींना खूप प्रोत्साहन देत होतो. ‘झालं…हा शेवटचा दिवस’ असं आमचं सुरू होतं.”
पुढे, याबद्दल मृणाल दुसानिस म्हणाली, “२२ दिवस तो सगळा शृंगार घेऊन वावरणं आणि त्यात भावनिकदृष्ट्या कठीण सीन्स करणं हे अजिबात सोपं नाहीये. अगदी शूट वरून घरी गेल्यावर सुद्धा मी नाकाला ( नथ पाहण्यासाठी ) हात लावायचे. तेव्हा माझा नवरा म्हणायचा अरे नथ नाहीये. माझ्यापेक्षा जास्त त्रास काव्या साकारणाऱ्या ज्ञानदाला झाला. कारण, एवढा शृंगार करून कधी काय काचतं, टोचतं… त्यामुळे हे अजिबात सोपं नाहीये.”
“मालिकेचा मूळ ट्रॅक पूर्ण तसाच होता. त्यामुळे हा सीक्वेन्स २२ दिवस शूट करणं आम्हाला भाग होतं. त्याचबरोबरीने आता पुरस्कार सोहळा आहे. त्यामुळे आमच्या डान्स रिहर्सल सुद्धा चालू होत्या. सगळेजण त्याच गडबडीत होते. आपण एका क्षणानंतर खरंच खूप कंटाळतो, तो सीक्वेन्स थकवणारा नक्कीच होता पण, या सगळ्या गोष्टी जेव्हा लोकांना आवडतात. तेव्हा आपल्या मेहनतीचं सार्थक झालं असं वाटतं.” असं मृणाल दुसानिसने सांगितलं.