‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तू तिथे मी’, ‘हे मन बावरे’, ‘अस्सं सासर सुरेख बाई’ अशा एकापेक्षा एक प्रसिद्ध मालिकांमधून छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणून मृणाल दुसानिसला ओळखलं जातं. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या सहज-सुंदर अभिनयाने मृणालने अल्पावधीतच एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला. छोट्या पडद्यावर लोकप्रियता मिळाल्यानंतर करिअरच्या शिखरावर असताना अभिनेत्रीने लग्न करण्याचा निर्णय घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मृणाल दुसानिसने २०१६ मध्ये नीरज मोरेशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर काही वर्षे मालिका विश्वात काम करून त्यानंतर मृणाल अमेरिकेत शिफ्ट झाली. २०२० मध्ये ‘हे मन बावरे’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेल्यावर अभिनेत्री काही काळ परदेशात राहण्यासाठी गेली होती. यंदा मार्च महिन्यात तब्बल ४ वर्षांनी मृणाल, तिचा नवरा नीरज व लाडक्या लेकीसह भारतात परतली. आपली लाडकी अभिनेत्री पुन्हा एकदा भारतात परतल्याचा आनंद सगळ्याच प्रेक्षकांना झाला होता. परंतु, त्यानंतर मृणाल मालिकाविश्वात केव्हा पुनरागमन करणार याची सर्वत्र चर्चा रंगली होती.

हेही वाचा : “मराठीचा टेंभा मिरवणारे….”, ‘वरळी हिट अँड रन’ प्रकरणावर उत्कर्ष शिंदेची पोस्ट; म्हणाला, “न्याय फक्त चित्रपटात…”

मृणालच्या पुनरागमनाची उत्सुकता तिच्या प्रत्येक चाहत्याच्या मनात निर्माण झाली आहे. भारतात परतल्यावर दिलेल्या अनेक मुलाखतींमध्ये ‘मला लवकरच काम करायला आवडेल’ अशी इच्छा बोलून दाखलत मृणालने पुनरागमनाचे संकेत दिले होते. अशातच आता सोशल मीडियावर व्हायरल होणारी एक पोस्ट सर्वत्र चर्चेत आली आहे.

मराठी सिरियल्स ऑफिशिअल या इन्स्टाग्राम पेजवरून नुकतीच एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “अँड वी आर बॅक ऑन द सेट” असं कॅप्शन दिलेला मृणालचा सेटवरचा एक फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. हा फोटो सेटवरचा असून यामध्ये अभिनेत्रीने पारंपरिक ड्रेस घातल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे मृणाल कमबॅक करणार असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत. आता मृणाल तब्बल ४ वर्षांनी नेमकी कोणत्या कार्यक्रमातून पुनरागमन करणार याकडे सर्वांचं लक्ष असेल मात्र, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

हेही वाचा : “अनंत अंबानीचे लग्न म्हणजे सर्कस,” अनुराग कश्यपच्या मुलीची टीका; म्हणाली, “मी जायला नकार दिला कारण…”

मृणाल दुसानिस

मृणालच्या चाहत्यांसह नेटकरी सध्या अभिनेत्रीच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. एवढेच नव्हे तर, या पोस्टवर मृणाल नेमकी कोणत्या वाहिनीवर झळकेल याबद्दल देखील नेटकऱ्यांची कमेंट्समध्ये चर्चा होत आहे. यावरून मृणालची लोकप्रियता किती आहे याचा अंदाज येतो. दरम्यान, मृणाल दुसानिस आता कायमस्वरुपी भारतात राहणार आहे. आता अभिनेत्री मालिकेत झळकणार की, नाटक किंवा चित्रपट अशा वेगळ्या माध्यमातून पुनरागमन करणार याचा उलगडा लवकरच होईल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mrunal dusanis back on the set after 4 years actress photo goes viral sva 00