Mrunal Dusanis Comeback : मराठी मालिकाविश्वातील नावाजलेल्या अभिनेत्रीपैंकी एक म्हणजे मृणाल दुसानिस. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तू तिथे मी’, ‘अस्सं सासर सुरेख बाई’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकांमधून मृणाल घराघरात पोहोचली. तिने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक अटळ स्थान निर्माण केलं. काही महिन्यांपूर्वीच मृणाल चार वर्षांनंतर अमेरिकहून भारतात परतली. गोदावरीच्या काठेवरील कुटुंबाबरोबरचा फोटो शेअर करून तिने ही चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. तेव्हापासून मृणालच्या कमबॅकची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. लवकरच ही प्रतिक्षा संपणार आहे. आता मृणाल ‘स्टार प्रवाह’वरच्या नव्या मालिकेतून जबरदस्त कमबॅक करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
गणेशोत्सवानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदा ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने ‘स्टार प्रवाह गणोशोत्सव २०२४’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. बाप्पाच्या गोष्टींचा खजिना या कार्यक्रमातून उलगडला जाणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ‘स्टार प्रवाह’ परिवारातील कलाकार या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी करताना दिसत आहेत. याच कलाकारांमध्ये ‘स्टार प्रवाह’चे काही जुने चेहरे आणि मृणाल दुसानिस ( Mrunal Dusanis ) पाहायला मिळाली.
काल २५ ऑगस्टला ‘स्टार प्रवाह’च्या सोशल मीडियावर काही कलाकारांच्या डान्स रिहर्सलचा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. ज्यामध्ये अभिनेत्री मृणाल दुसानिससह ( Mrunal Dusanis ) ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतील युवराज म्हणजेच अभिनेता विजय आंदळकर डान्स करताना दिसला. तसंच आणखीन दोन जोड्या पाहायला मिळाल्या. ‘देवयानी’ मालिकेतील एक्का म्हणजे अभिनेता विवेक सांगळे आणि ‘ठिपक्यांची रांगोळी’मधील अप्पू म्हणजे अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर ही जोडी दिसली. तर तिसरी जोडी होती ‘कुन्या राजाची गं तू राणी’ मधील अभिनेत्री शर्वरी जोग आणि अभिनेता अभिजित आमकर. या तिन्ही जोड्यांना पाहून हे कलाकार ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेतून जबरदस्त कमबॅक करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
पण मृणाल दुसानिस ( Mrunal Dusanis )-विजय आंदळकर, विवेक सांगळे-ज्ञानदा रामतीर्थकर आणि शर्वरी जोग-अभिजित आमकर या तिन्ही जोड्या एकाच मालिकेत झळकणार की वेगवेगळ्या मालिकेत पाहायला मिळणार? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पण या प्रश्नांची उत्तर ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४’ कार्यक्रमातून मिळण्याची शक्यता आहे. १ सप्टेंबरला संध्याकाळी ७ वाजता ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४’ कार्यक्रम प्रसारित होणार आहे.