चार वर्षांनी अमेरिकेहून भारतात परतणारी अभिनेत्री मृणाल दुसानिस लवकरच नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाहच्या गणेशोत्सव २०२४ सोहळ्यात नव्या मालिकेच्या कलाकारांचा खुलासा झाला. यामध्ये मृणाल दुसानिस पाहायला मिळाली. त्यामुळे आता मृणाल कोणत्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार? याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. सध्या अभिनेत्री भारतात आल्यानंतरचा पहिला गणेशोत्सव आपल्या कुटुंबासह साजरा करताना पाहायला मिळत आहे. यंदा मृणालने लेकीसाठी घरी बाप्पाला आणला आहे.
गणेशोत्सवानिमित्ताने अभिनेत्री मृणाल दुसानिसने नुकताच ‘राजश्री मराठी’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलशी संवाद साधला. यावेळी तिने मुंबईतल्या घरी गणपती का विराजमान केला? सजावट कशी केली? गणपतीची सुंदर मूर्ती कोणी निवडली? या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली आहेत. मृणालच्या घरी १० दिवसांसाठी बाप्पा विराजमान झाला आहे.
अभिनेत्री मृणाल दुसानिस म्हणाली, “खरंतर माझी मुलगी खूप मस्तीखोर आहे. तिला गणपतीचं विशेष आकर्षण आहे. जेव्हापासून तिला कळायला लागलंय बाप्पा म्हणजे काय तर गणपती असं. त्यामुळे तिच्यासाठी आम्ही मुंबईतच गणपती बसवला. कारण आता माझं काम सुरू होतंय. नीरजचं पण काम सुरू आहे. तर आम्हाला सतत पुण्याला जाऊन-येऊन करणं शक्य होणार नाही. त्यामुळे आम्ही सगळ्या कुटुंबाने मिळून ठरवलं की, मुंबईत गणपती बसवायचा. आमच्याकडे दरवर्षी १० दिवसांचा गणपती असतो. माझ्या माहेरी आणि सासरी सुद्धा गणपती असतो.”
हेही वाचा – लवकरच दोन लोकप्रिय मराठी मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, कोणत्या जाणून घ्या…
पुढे लेक नुरवीला सांभाळत कशी गणपतीसाठी तयारी केली? याविषयी मृणालने सांगितलं. ती म्हणाली, “डेकोरेशन असं काही खास केलं नाहीये. अगदी आयत्या वेळी जे मिळेल, सुचेल ते केलं आहे. आम्हाला साध्या फुलांचा हार आणि साधा गणपती हवा होता. त्यामुळे आम्ही माझी नऊवारी साडी टाकून डेकोरेशन केलं आहे. फुलांच्या माळांनी फक्त सजवलं आहे. जितकं नैसर्गिक आणि कमी खर्चात छान होईल असा प्रयत्न आम्ही केला आहे. कारण प्रत्येक जण आपल्या कामावरून घरी आल्यानंतर विचार करायला थोडा वेळ लागतो.”
मृणाल दुसानिसने कशी घरच्या बाप्पाची मूर्ती निवडली?
त्यानंतर गणपतीची मूर्ती कशी निवडली? असं अभिनेत्रीला विचारण्यात आलं. त्यावर ती म्हणाली, “ही आमच्या नुरवीला आवडलेली मूर्ती आहे. आम्ही विचार केला की ठरवलेली मूर्ती घ्यायची. पण यावेळी आम्ही ठरवलं जरा वेगळं करू या. म्हणून नुरवीला जी मूर्ती आवडली, तिच निवडली आहे. महत्त्वाचं म्हणजे आम्ही शाडू मातीची मूर्ती घेतली आहे. हे आम्हाला प्रकर्षाने करायचं होतं. लाल धोतर, मुकूट, माणिक मणी लावलेली मूर्ती घेतली आहे.”