Mrunal Dusanis & Shashank Ketkar : छोट्या पडद्यावर सध्या नवनवीन मालिकांचा सिलसिला सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, निवेदिता सराफ, मुक्ता बर्वे, अक्षया देवधर, हर्षदा खानविलकर, चार वर्षांनी भारतात परतलेली मृणाल दुसानिस असे सगळे कलाकार टेलिव्हिजनवर पुन्हा एकदा पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहे. यांच्या दमदार कलाकारांच्या विविध मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
अमेरिकेहून भारतात परतणारी अभिनेत्री मृणाल दुसानिस ( Mrunal Dusanis ) तब्बल चार वर्षांनी मालिका विश्वात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. पण, त्याआधीच तिच्या चाहत्यांसाठी ‘कलर्स मराठी’ वाहिनीने एक आनंदाची बातमी दिली आहे. मृणाल अमेरिकेत जाण्याआधी ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’ या लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिका साकारत होती. ही मालिका ९ ऑक्टोबर २०१८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यानंतर पुढचे दोन वर्षं या मालिकेने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं.
‘कलर्स मराठी’चा मोठा निर्णय
मृणालने या मालिकेत अनुश्री तर, शशांक केतकरने यामध्ये सिद्धार्थची भूमिका साकारली होती. या मुख्य जोडीसह यामध्ये शर्मिष्ठा राऊत, विदिषा म्हसकर, वंदना गुप्ते असे लोकप्रिय कलाकार होते. ही मालिका छोट्या पडद्यावर प्रचंड गाजली. आता ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. “प्रेमाच्या सरींनी मन पुन्हा बावरणार, सिद्धार्थ आणि अनुश्री परत तुमच्या भेटीला येणार!” असं कॅप्शन देत ‘कलर्स मराठी’ वाहिनीने मालिकेच्या पुन:प्रसारणाची घोषणा केली आहे.
‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ ही लोकप्रिय मालिका येत्या १८ नोव्हेंबरपासून दुपारी १ वाजता ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे. यामुळे मृणाल ( Mrunal Dusanis ) आणि शशांकचे चाहते प्रचंड आनंदी झाले आहेत. नेटकऱ्यांनी या मालिकेच्या नव्या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, आता ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ ( Mrunal Dusanis ) ही मालिका दुपारच्या सत्रात पुन्हा सुरू झाल्यावर वाहिनीच्या टीआरपीवर याचा काय सकारात्मक परिणाम होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.