गाजलेल्या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मृणाल दुसानिस आता चार वर्षांनी भारतात परतली आहे. करिअरच्या शिखरावर असताना तिने लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी तिची ‘हे मन बावरे’ ही मालिका चालू होती. मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यावर मृणाल आपल्या नवऱ्याबरोबर अमेरिकेत राहायला गेली. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘अस्सं सासर सुरेख बाई’, ‘तू तिथे मी’ अशा बऱ्याच मालिकांमध्ये तिने काम केलेलं आहे. त्यामुळे गेली काही वर्षे प्रेक्षकही मृणालला मिस करत होते. अखेर चार वर्षांनी अभिनेत्री आपल्या कुटुंबीयांबरोबर पुन्हा एकदा कायमस्वरुपी भारतात परतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मृणाल आता ठाण्याला शिफ्ट झाली असून काही दिवसांत ती पुन्हा एकदा मालिकाविश्वात काम करायला सुरुवात करणार आहे. नुकतीच तिने सुलेखा तळवलकरांच्या ‘दिल कें करीब’ मुलाखतीला उपस्थिती लावली होती. यावेळी अमेरिकेतील काही किस्से तिने चाहत्यांना सांगितले. मृणाल म्हणाली, “माझा नवरा माझी खूप काळजी घेतो. माझ्या काळजीपोटी तो खरंच खूप काही करतो. याबद्दल सांगायचं झालं, तर मी गरोदर होते आणि तो कोव्हिडचा काळ होता. करोना सुरु असल्याने माझी आई अमेरिकेत येऊ शकत नव्हती.”

हेही वाचा : ठरलं तर मग : अर्जुन-सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपणार? उरले शेवटचे फक्त दोन दिवस…; मालिकेचा नवा प्रोमो आला समोर

“आईचा अमेरिकेत यायचा व्हिसा अडकला होता. त्यामुळे ते ९ महिने मी आणि माझी आई आम्ही दोघंच जण एकमेकांसाठी होतो. विमानसेवा बंद होत्या त्यामुळे कुटुंबातील इतर लोक सुद्धा येऊ शकत नव्हते. त्या काळात त्याने मला खूप जपलं आणि तो तेवढा काळ आमच्यासाठी खूप अवघड होता. या सगळ्यात आमचं बॉण्डिंग आणखी घट्ट झालं आणि आम्ही एकमेकांना अजून चांगल्याप्रकारे समजून घेऊ शकलो.” असं मृणाल दुसानिसने सांगितलं.

हेही वाचा : Video : “बाबा गेले अन् आईने त्यांचा फोटो जवळ घेऊन…”, ‘तो’ प्रसंग सांगताना कुशल बद्रिकेला अश्रू अनावर

दरम्यान, मृणाल दुसानिस ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आता चार वर्षांनी भारतात परतल्यावर अभिनेत्री मालिकांमध्ये पुनरागमन केव्हा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. येत्या काळात मृणालला नवनवीन भूमिकांमध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.