मराठी सिनेविश्वातील बऱ्याच कलाकारांनी गेल्या काही वर्षांत नवनवीन व्यवसाय सुरू करण्यास प्राधान्य दिलं आहे. सुप्रिया पाठारे, महेश मांजरेकर यांचा मुलगा, प्राजक्ता माळी, प्रार्थना बेहेरे, हार्दिक जोशी, अनघा अतुला, तेजस्विनी पंडित असे सगळेच कलाकार अभिनय क्षेत्र सांभाळून व्यवसाय क्षेत्रात मोठी भरारी घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं.
दरवर्षी उन्हाळा आला की, मुंबईकरांना आंब्याची ओढ लागते. अशातच जर कोकणातील हापूस आंबे मिळाले, तर आणि काय हवं? अशी भावना प्रत्येक चाकरमान्याच्या मनात निर्माण होते. त्यामुळे या सगळ्या आंबाप्रेमींना प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन यांनी आनंदाची बातमी दिली आहे.
मुग्धा-प्रथमेशची जोडी घराघरांत लोकप्रिय आहे. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये या जोडप्याने लग्नगाठ बांधली. प्रथमेश मूळचा रत्नागिरी येथील आरवलीचा आहे. त्यामुळे दरवर्षी त्यांच्या घरी आंब्याचा व्यवसाय केला जातो. याबद्दल या दोघांनी खास पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. “नमस्कार! वेलकम टू मँगो सीझन २०२४…आंबाप्रेमींच्या सेवेत पुन्हा रुजू होत आहोत आतापासून…तीच चव, अव्वल दर्जा, तसाच गोडवा. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तुम्हा सर्वांसाठी यावर्षीही घेऊन येत आहोत अस्सल रत्नागिरी हापूस” असं कॅप्शन प्रथमेशने या पोस्टला दिलं आहे. तसेच इच्छुक ग्राहक आतापासूनच ऑर्डर बूक करू शकतात असंही गायकाने कॅप्शनमध्ये नमूद केलं आहे.
मुग्धा-प्रथमेश सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आले. यानंतर काही वर्षांनी गाण्यांचे कार्यक्रम करताना गायकाने मुग्धाला लग्नासाठी मागणी घातली. काही वर्षे डेट केल्यावर गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात या जोडप्याने लग्नगाठ बांधली.
दरम्यान, प्रथमेशने शेअर केलेली आंबा व्यवसायाची पोस्ट पाहून त्याच्या चाहत्यांनी गायकावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “आपल्या लोकांनी व्यवसाय केला की बरं वाटतं”, “तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी प्रथमेशने शेअर केलेल्या पोस्टवर केल्या आहेत.