मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांची जोडी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या शोमुळे मुग्धा-प्रथमेश प्रसिद्धीझोतात आले. यानंतर काही वर्षांनी दोघंही एकत्र गाण्यांचे कार्यक्रम घेऊ लागले. यादरम्यान, दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन प्रेक्षकांच्या या लाडक्या जोडीने सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिली होती. डिसेंबर २०२३ मध्ये लग्नगाठ बांधत मुग्धा-प्रथमेश यांनी आपल्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या मुग्धा-प्रथमेश महाराष्ट्रासह जगभरातील विविध ठिकाणी आपल्या गाण्यांचे कार्यक्रम आयोजित करत असतात. त्यांच्या सुमधूर आवाजाने श्रोतेही मंत्रमुग्ध होतात. नुकताच या दोघांनी नागपूर येथील धापेवाडा या भागात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम सादर केला. यावेळी मुग्धा-प्रथमेशचं गाणं ऐकण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्वत: उपस्थित होते. त्यांनी कार्यक्रमादरम्यान मुग्धा-प्रथमेशची भेट घेऊन त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल्याचे फोटो गायिकेने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी नितीन गडकरी यांचे कुटुंबीय सुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमातील क्षणचित्रे मुग्धाने सोशल मीडियावर शेअर करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपस्थित प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

“नमस्कार! काल नागपूर जवळील ‘विदर्भातील पंढरपूर’ म्हटलं जाणाऱ्या धापेवाडा येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व त्यांच्या संपूर्ण परिवारासमोर आमचं गाणं सादर करायची संधी मिळाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पहिल्यापासून शेवटपर्यंत कार्यक्रम ऐकण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. ते, त्यांचा परिवार आणि उपस्थित सर्व रसिकांचे मनापासून आभार. या प्रसंगीची काही क्षणचित्रे आपल्याबरोबर शेअर करत आहोत…” असं मुग्धाने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “आम्ही कार्यक्रमाला उपस्थित होतो. खूप छान झाला कार्यक्रम”, “वाह क्या बात है खूप अभिनंदन”, “आयुष्यातील अविस्मरणीय असा क्षण, खूप छान कार्यक्रम” अशा कमेंट्स मुग्धाच्या चाहत्यांनी या पोस्टवर केल्या आहेत.

दरम्यान, मुग्धा-प्रथमेशच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं, तर २१ डिसेंबर २०२३ ला मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे लग्नबंधनात अडकले होते. मोठ्या थाटामाटात पारंपरिक पद्धतीने दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता. दोघांच्या लग्नातले फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.