Mugdha Vaishampayan & Prathamesh Laghate : मराठी सिनेविश्वात सक्रिय असणाऱ्या अनेक सेलिब्रिटींनी गेल्या काही वर्षांत अभिनयाच्या जोडीला आपले नवीन व्यवसाय सुरू केले आहेत. प्राजक्ता माळी, रुपाली भोसले, महेश मांजरेकर, प्रार्थना बेहेरे, हार्दिक जोशी, अनघा अतुल असे अनेक कलाकार व्यवसाय क्षेत्रात सक्रिय आहेत. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या शोमधून घराघरांत पोहोचलेल्या मुग्धा-प्रथमेशच्या जोडीने सुद्धा नुकतीच त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
एप्रिल-मे महिना जवळ आल्यावर सर्वांना आंब्याची ओढ लागते. त्यातही कोकणातील हापूस आंबा सर्वांनाच प्रिय असतो. प्रत्येकाला कोकणात गावी जाऊन आंबे खाणं शक्य होत नाही, त्यामुळे या सगळ्या आंबाप्रेमींसाठी प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.
मुग्धा-प्रथमेशची जोडी घराघरांत लोकप्रिय आहे. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये या जोडप्याने लग्नगाठ बांधली. प्रथमेश मूळचा रत्नागिरी येथील आरवलीचा आहे. त्यामुळे दरवर्षी त्यांच्या घरी आंब्याचा व्यवसाय केला जातो. याबद्दल या दोघांनी खास पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. “नमस्कार! वेलकम टू मँगो सीझन २०२५… आंबाप्रेमींच्या सेवेत यावर्षी सुद्धा रुजू होत आहोत! तीच चव, अव्वल दर्जा, तसाच गोडवा! गुढीपाडव्यासाठी ‘लघाटे आंबेवाले’ यांच्याकडे आपली ऑर्डर त्वरित बुक करा आणि नववर्षाच्या स्वागताची दिमाखदार परंपरा अबाधित ठेवा!” असं कॅप्शन प्रथमेशने या पोस्टला दिलं आहे. तसेच इच्छुक ग्राहक आतापासूनच ऑर्डर बूक करू शकतात असंही गायकाने कॅप्शनमध्ये नमूद केलं आहे.
मुग्धा-प्रथमेशच्या पोस्टवर कमेंट्स करत नेटकऱ्यांनी या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. गेल्यावर्षी सुद्धा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या जोडप्याने त्यांचा आंब्याचा व्यवसाय सुरू केला होता, आता पुन्हा एकदा आंब्याच्या सीझनला सुरुवात झाल्याने गायकाने पोस्ट शेअर करत आंब्यांच्या ऑर्डर सुरू करण्यात आल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.
दरम्यान, या दोघांची पहिली भेट ‘सारेगमप’ लिटिल चॅम्प्स या शोमध्ये झाली होती. ‘सारेगमप’ संपल्यावर पुढे काही वर्षांनी दोघेही एकत्र गाण्याचे कार्यक्रम करू लागले. गाण्यांच्या कार्यक्रमांमुळे त्यांचं भेटणं व्हायचं आणि त्या दरम्यानच दोघांना एकमेकांविषयी भावना निर्माण झाल्या. एकदा गाण्याच्या कार्यक्रमाची तालीम सुरु असताना प्रथमेशने आपल्या प्रेमाची कबुली मुग्धासमोर दिली. २०२३ मध्ये ही जोडी लग्नबंधनात अडकली.