‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वातून घराघरात पोहोचलेले मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे लग्न झाल्यापासून कायम चर्चेत असतात. गेल्या वर्षी २१ डिसेंबरला मुग्धा व प्रथमेश लग्नबंधनात अडकले. दोघांच्या लग्नाला पाच महिने झाले असून नुकतेच दोघं नेपाळ ट्रीपवर गेले होते. सात-आठ दिवसांच्या नेपाळ ट्रीप नंतर मुग्धा-प्रथमेश मायदेशी परतले आहेत. याचा फोटो त्यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.
सात-आठ दिवसांच्या नेपाळ ट्रीपमध्ये मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेने नेपाळमधील प्रसिद्ध ठिकाणांना भेट दिली. मनाकामना, पोखरा, फेवा लेक, महादेव केव्ह, गुप्तेश्वर, फिश्तैल अशा बऱ्याच ठिकाणी दोघं फिरले. तसंच काही मंदिरात जाऊन जोडीने दर्शन घेतलं. जंगल सफारी केली. शिवाय नेपाळी थाळीवर चांगलाच दोघांनी ताव मारला. पारंपरिक नेपाळी पदार्थ दोघांनी खाल्ले. अशी संपूर्ण सात-आठ दिवसांची नेपाळ भ्रमंती करून मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे आता मायदेशी परतले आहेत.
काल मुग्धाने नेपाळी थाळीचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. ज्यामध्ये बटाटा-फरसबी भाजी, पनीर करी, लसुणी मेथी, कुरकुरी भेंडी, उडीद डाळ, टोमॅटो चटणी, कांदा-गाजर-काकडीचं सॅलेड, फुलके, उडीद पापड, भात असं सर्व काही नेपाळी थाळीमध्ये पाहायला मिळालं. तसंच बटाटा चीझ स्टफेड इन दुधीभोपळा या पदार्थाचा आस्वाद देखील दोघांनी घेतला. या नेपाळी पदार्थांवर चांगलाच ताव मारल्यानंतर दोघं मायदेशी परतण्यासाठी निघाले.
काठमांडू विमानतळावरून मुग्धा व प्रथमेशच्या विमानाने उड्डाण केलं. विमानातला फोटो शेअर करून मुग्धाने लिहिलं होतं, “चला घरी.” घरी परतल्यानंतर दोघांनी मित्रांची व नातेवाईकांची भेट घेतली. याचा देखील फोटो मुग्धाने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.
दरम्यान, मुग्धा-प्रथमेशच्या कामाबद्दल बोलायचं झालं, दोघांच्या संगीताचे अनेक कार्यक्रम सतत होतं असतात. उद्या, १६ जूनला नाशिकच्या महाकवि कालिदास कला मंदिर येथे भक्तीगीते, अभंग, नाट्यसंगीत यांचा सुरेल नजराणा दोघांचा पाहायला मिळणार आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच मुग्धा व प्रथमेशचा नाशिकमध्ये हा एकत्र कार्यक्रम असणार आहे.