‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेले प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. सोशल मीडियावर त्यांचा एक फोटो शेअर करत “आमचं ठरलं!” असं लिहित त्यांनी त्यांचं नातं जगासमोर आणलं. आता मुग्धाच्या लग्नाच्या केळवणांना सुरुवात झाली असतानाच तिच्या सख्ख्या बहिणीचही लग्न ठरलं असल्याचं समोर आलं आहे.
मुग्धा आणि प्रथमेश यांच्या लग्नाच्या केळवणांना सुरुवात झाली आहे. त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी त्यांचं थाटामाटात केळवण करत आहेत. अशाच एका केळवणाचा फोटो मुग्धाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. त्यात मुग्धाची बहिण मृदुलाचं लग्न ठरलं असल्याचं मुग्धाने स्पष्ट केलं.
तिने त्यांचा एक फॅमिली फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत लिहिलं, “प्रिय, लाडके, डिअरेस्ट देवानंद काका, तुम्ही आम्हाला सोडून जाऊन ३ वर्ष झाली. असा एकही दिवस जात नाही की तुमची आठवण येत नाही… आज माझं आणि ताईचं केळवण होतं आपल्या खानावला.. तुम्हाला अशक्य मिस केलं…” तर यामधून मुग्धाबरोबरच मुग्धाची बहीणही लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याचं समोर आलं.
दरम्यान, मुग्धा आणि प्रथमेश यांनी त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे आधी मुग्ध लग्न करते की तिची बहीण याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.