‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली मुग्धा वैशंपायन सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रथमेश लघाटे आणि ती एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा त्यांनी केला आणि त्यांचं नातं सर्वांसमोर आणलं. आता त्यांनी एकमेकांबद्दल त्यांना आवडणाऱ्या आणि नावडणाऱ्या गोष्टींचा खुलासा केला आहे.
मुग्धा आणि प्रथमेशने त्यांचं नातं सर्वांसमोर आणल्यावर त्यांच्या चाहत्यांमध्ये त्यांच्याबद्दल खूप उत्सुकता निर्माण झाली होती. त्यामुळे प्रथमेश व मुग्धाने त्यांच्या चाहत्यांसाठी एक खास प्रश्न उत्तरांचं सेशन आयोजित केलं होतं. त्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ पोस्ट करून त्यांच्या चाहत्यांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी त्या दोघांनी एकमेकांबद्दलच्या नावडत्या गोष्टीही सांगितल्या.
एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी एकमेकांच्या स्वभावांमधील त्यांना कोणती गोष्ट आवडत नाही हे सांगितलं. मुग्धा म्हणाली, “प्रथमेश खूप गुणी आणि प्रेमळ मुलगा आहे पण तो आळशी आहे.” तिचं हे बोलणं प्रथमेशनेही मान्य केलं. तर मुग्धाबद्दल नावडणारी गोष्ट सांगताना प्रथमेश म्हणाला, “ती खूप फूडी आहे आणि म्हणून ती तिच्या डाएटमध्ये भरपूर चीट डे करते. तिने ते चीट डे करणं कमी करावं.”
प्रथमेश आणि मुग्धाचं हे गमतीशीर बोलणं सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. तर त्यांच्या या बोलण्यावर त्यांचे चाहते प्रतिक्रिया देत त्यांचा दिलखुलासपणा आवडल्याचं त्यांना सांगत आहेत.