‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांची जोडी घराघरांत लोकप्रिय झाली. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यावर या जोडीने २१ डिसेंबरला चिपळूण येथे लग्नगाठ बांधली. मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते. या दोघांच्या लग्नातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नानंतर मुग्धा एका कामानिमित्त अंदमानला गेली होती. अंदमान दौऱ्याहून परतल्यानंतर मुग्धा-प्रथमेश दोघेही रत्नागिरीला गेले आहेत.
मुग्धा-प्रथमेश सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. लग्नानंतर पुन्हा एकदा या जोडप्याने गाण्यांच्या कार्यक्रमांना सुरुवात केली आहे. दोघांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना विशेष आवडते. सध्या गायिकने शेअर केलेल्या अशाच एका इन्स्टाग्राम स्टोरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
हेही वाचा : “माझं दिसणं, बोलणं, रंग, उंची…”, जुई गडकरीने सांगितला इंडस्ट्रीमधील अनुभव; बॉडी शेमिंगचा उल्लेख करत म्हणाली…
मुग्धाचं सासर रत्नागिरीमध्ये आरवली गावात आहे. लग्नानंतर या जोडप्याचं प्रथमेशच्या घरी जंगी स्वागत करण्यात आलं होतं. आता गायिका अंदमान दौऱ्याहून परतल्यानंतर सासरी कोकणात पोहोचली आहे. मुग्धाने इन्स्टाग्रामवर तिच्या सासरच्या घराची झलक शेअर केली आहे.
हेही वाचा : ऐका दाजीबा! अवधूत गुप्तेच्या सुपरहिट गाण्याला २१ वर्षे पूर्ण, गायकाने शेअर केला खास डान्स व्हिडीओ
मुग्धाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचं सासरचं घर आणि परिसरातील निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळत आहे. या फोटोला तिने “आरवलीच्या थंडीतील निसर्गरम्य पहाट” असं कॅप्शन दिलं आहे. लग्नानंतर दोघेही जोडीने गावच्या घरी गेल्याचं या फोटोंवरून स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, या दोघांच्या प्रेमकहाणीबद्दल सांगायचं, झालं तर ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये या दोघांनी एकत्र सहभाग घेतला होता. त्यानंतर काही वर्षात गाण्यांच्या शोच्या निमित्ताने दोघांमध्ये चांगली मैत्री होऊन या मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. काही वर्षे डेट केल्यावर या जोडप्याने डिसेंबर २०२३ मध्ये लग्नगाठ बांधली.