मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. हे दोघे ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे घराघरांत लोकप्रिय झाले. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यावर गेल्या वर्षाच्या अखेरीस मुग्धा-प्रथमेशने लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नाला मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकार मंडळींनी खास उपस्थिती लावली होती. सध्या प्रेक्षकांची ही लाडकी जोडी सुखाने संसार करत असून आपल्या दैनंदिन जीवनातील अपडेट इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
मुग्धा-प्रथमेशचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. हे दोघेही जोडीने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात अनेक ठिकाणी गाण्यांचे कार्यक्रम करतात. डिसेंबर महिन्यात थाटामाटात लग्न केल्यानंतर सासरी मुग्धाचं जोरदार स्वागत करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांत गायिकने सासरचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. सध्या ही जोडी मुग्धाच्या माहेरी म्हणजेच अलिबागमध्ये धमाल करत आहेत.
मुग्धा वैशंपायन तिच्या आई-बाबांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खास नवऱ्याबरोबर तिच्या माहेरी गेली आहे. यावेळी गायिकेने कुटुंबीयांबरोबर एकत्र जेवण व धमाल केली. याचा खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये तिची सगळी भावंडं एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, याचबरोबर मुग्धाने तिच्या स्टोरीवर आंबोळी-बटाट्याजी भाजी, सांभार-चटणी या साग्रसंगीत दाक्षिणात्य जेवणाचा फोटो देखील शेअर केला होता. यामध्ये मुग्धाची बहीण मृदुल देखील आई-बाबांच्या वाढदिवसानिमित्त माहेरी आल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या या जोडप्याच्या कोकणदौऱ्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.