‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून घराघरात पोहोचलेली मुग्धा वैशंपायन नेहमी आपल्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असते. तिचा चाहता वर्ग बराच मोठा आहे. गेल्या काही महिन्यांपासून मुग्धा व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यामुळे सारखी चर्चेत असते. सध्या ती अंदमान दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरील फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर मुग्धा सातत्याने शेअर करत आहे. नुकताच तिने अंदमानचा विक्राळ रुप पहिल्यांदा पाहिल्याचा अनुभव सांगितला.
मुग्धा वैशंपायनचा अंदमान दौऱ्यातील आज चौथा दिवस आहे. ती पाच दिवसाच्या अंदमान दौऱ्यावर आहे. आजचा अंदमानमधील अनुभव इन्स्टाग्रामवरून सांगत मुग्धाने लिहिलं आहे, “नभ क्षणात भरले, क्षणात झडल्या धारा अन् उन्हास चढला, रजतरसाचा पारा – प्रविण दवणे. आज ही कविता अनुभवली.”
पुढे मुग्धाने लिहिलं आहे, “वादळी वाऱ्याच्या पावसासह, प्रचंड मोठ्या लाटांमधून बोटीचा २ तासांचा प्रवास करत आम्ही शहीद बेटावरून पोर्ट ब्लेअरला पोहोचलो. क्रूझ खूप हलत होती. जेट्टीवरून क्रूझमध्ये बसेपर्यंत चिंब भिजलो होतो. पुढे तसेच २ तास बसलो. अंदमानचा निसर्ग विलक्षण सुंदर आहे हे आजपर्यंत अनुभवलं होतं. अंदमानात वातावरण क्षणात बदलून अचानक पाऊस सुरू होतो हे सुद्धा ऐकलं होतं. पण आज पहिल्यांदाच अंदमानाचं हे विक्राळ रुप बघितलं, अनुभवलं.”
हेही वाचा – “एका शोचे किती पैसे घेता?” चाहत्याच्या प्रश्नावर राहुल देशपांडे उत्तर देत म्हणाले…
दरम्यान, काल, २५ जानेवारीला मुग्धाने नवरा प्रथमेशसाठी इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. ज्यामधून तिने लिहिलं होतं, “प्रथमेश मला तुझी खूप आठवण येतेय.” मुग्धाची ही स्टोरी चांगलीच व्हायरल झाली होती.