एकेकाळी दूरदर्शनवर गाजलेली ‘शक्तिमान’ मालिका आजतागायत प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. ९० च्या काळात अभिनेता मुकेश खन्ना यांनी शक्तिमानची भूमिका साकारली होती. त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीलाच ‘शक्तिमान’ मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याची घोषणा करण्यात आली. या बिग बजेट सिनेमात रणवीर सिंह सुपरहिरोच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. परंतु, या कास्टिंगबद्दल मुकेश खन्ना यांनी अलीकडेच नाराजी व्यक्त केली.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत मुकेश खन्ना म्हणाले, “चित्रपटाच्या कास्टिंगबद्दल इंटरनेटवर अफवा येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या चित्रपटात रणवीरच्या आधी शाहरुख खान मुख्य भूमिकेत असल्याची अफवा पसरली होती.”
मुकेश पुढे म्हणाले, “मला सध्याच्या अनुमानांवर भाष्य करायला आवडणार नाही. शाहरुख खान, अक्षय कुमार, अजय देवगण किंवा टायगर श्रॉफ यापैकी कोणीही शक्तिमानची भूमिका साकारू शकणार नाही. कारण- शक्तिमानला जो चेहरा हवा आहे, तो यापैकी कोणाचाही नाही. कारण- त्यांची एक विशिष्ट इमेज आहे.
मुकेश खन्ना यांच्या मते, या भूमिकेसाठी नवीन अभिनेत्याला कास्ट करायला हवं. “मुलांना शिकवू शकेल असा शक्तिमान हवा आहे. तुम्ही मला विचाराल, तर एक नवीन माणूस असावा, असं मला वाटतं,” असंही ते म्हणाले.
मुकेश खन्ना यांनी ‘शक्तिमान’च्या यशानंतर त्या पात्रावर आधारित दुसऱ्या शोसाठी ‘स्टार इंडिया’शी संवाद साधला होता; परंतु ते शक्य झालं नाही. त्यांनी असंही सांगितलं की, शक्तिमान ही पौराणिक कथा आहे आणि अद्याप चित्रपटाच्या कथेवर काम सुरू झालेलं नाही.
दरम्यान, शक्तिमानवर आधारित चित्रपटाची घोषणा २०२२ मध्ये सोनी पिक्चर्स इंडियानं केली होती. मात्र, चित्रपटाबाबत अधिक माहिती अद्याप जाहीर झालेली नाही.