छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम अत्यंत आवडीने पाहिला जातो. या कार्यक्रमातील हास्यवीर प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडतात. हास्यजत्रेतील कलाकारांवरही प्रेक्षक अगदी भरभरुन प्रेम करतात.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाच्या स्किटमधील अनेक डायलॉगही चाहत्यांच्या कायमच तोंडावर असतात. मग तो गौरव मोरेचा “आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा” असो अथवा ओंकार भोजनेचा ‘अगं अगं आई’ असो. हास्यवीर समीर चौगुलेंच्या दरवाजाच्या बेलचा आवाज काढण्यापासून ते ‘हमरे का तुमरे का’ पर्यंत सगळं प्रेक्षकांच्या तोंडपाठ असतं. समीर चौगुलेंचा स्किटमधील एक फेमस डायलॉग म्हणजे ‘शिवाली हे खरं आहे का?’. त्यांच्या या डायलॉगची भूरळ चाहत्यांप्रमाणेच मुंबई पोलिसांनाही पडली आहे.
हेही वाचा >> Video: ‘दृश्यम २’ फेम अभिनेत्रीचा पतीसह लिपलॉक करतानाचा एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणतात…
मुंबई पोलिसांच्या ऑफिशिअल सोशल मीडीया अकाऊंटवरुन समीर चौगुलेंच्या या डायलॉगवरुन एक मीम शेअर करण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांकडून सायबर सुरक्षिततेच्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी अनेकदा असे मीम पोस्टर शेअर केले जातात. आताही समीर चौगुलेंच्या डायलॉगच्या वापर करुन पासवर्डबद्दल जनजागृती या पोस्टद्वारे करण्यात आली आहे. हास्यजत्रेतील समीर चौगुले व शिवाली परब यांच्या स्किटमधील एक सीनचा फोटो शेअर करत त्यावर “माझा संकेतशब्द माझी जन्मतारीख आहे” असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे. त्याखाली समीर चौगुलेंचा “शिवाली हे खरं आहे का?” हा डायलॉग लिहिण्यात आला आहे.
आणखी वाचा >> ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेला मिळालं हिंदी जाहिरातीत काम, व्हिडीओ पाहिलात का?
मुंबई पोलिसांच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या या मीमला “हा शुद्ध बालिशपणा आहे शिवाली! असा बालिशपणा तुम्ही करू नका आणि आपला संकेतशब्द अक्षरे, अंक व विशेष चिन्ह वापरून तयार करा!” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. महाराष्ट्राच्या हास्यजत्रेच्या चाहत्यांसह समीर चौगुलेंनीही या मीमला लाइक केलं आहे. हा मीम हास्यजत्रेच्या चाहत्यांच्या भलताच पसंतीस उतरला असून त्यावर कमेंटही केल्या आहेत.