अभिनेत्री केतकी चितळे सध्या अभिनय क्षेत्रापासून दूर असली तरी वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असते. केतकी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली परखड मत मांडत असते. शिवाय दैनंदिन जीवनातले अनुभव चाहत्यांबरोबर शेअर करत असते. आज, प्रजासत्ताक दिनी केतकीबरोबर एक घटना घडली; त्याचा व्हिडीओ तिने नुकताच शेअर केला आहे.
केतकी चितळेने हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “या देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क, समान कायदा, समान नियम नाहीत. आज ज्या दिवशी भारत सार्वभौम प्रजासत्ताक झाला, त्या दिवशी महानगरपालिका भेदभाव करण्यासाठी लोकांना घरी पाठवून, दारं ठोठवून जात विचारत आहे. अब गाओ संविधान, संविधान.”
हेही वाचा – “एका शोचे किती पैसे घेता?” चाहत्याच्या प्रश्नावर राहुल देशपांडे उत्तर देत म्हणाले…
या व्हिडीओत, केतकी जात विचारायला आलेल्या महिलेची विचारपूस करत आहे. तुम्ही जात विचारायला का आला आहात? असं अभिनेत्री विचारताना दिसत आहे. तेव्हा ती महिला म्हणते की, मराठा आरक्षणासाठी सर्व्हे सुरू आहे. यावेळी ती महिला केतकीला तुम्हीपण मराठा आहात का? असं विचारते. तेव्हा केतकी म्हणते, “अजिबात नाही. चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण आहे.” ती महिला गेल्यानंतर अभिनेत्री पुढे म्हणते की, प्रत्येक नागरिकाला समान कायदा नाहीये. आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हा सर्व्हे सुरू आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
केतकीची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. एका नेटकऱ्याने अभिनेत्रीच्या या पोस्टवर लिहिलं आहे, “तुम्ही पण मराठा आहेत का? असं विचारलं तर जितक्या झटकन ‘अजिबात नाही’ म्हणून ‘ब्राह्मण’ आहे असं सांगितलं. यावरून कळतं की तुमचा मराठा जातीबद्दल किती द्वेष आहे व स्वतःच्या जातीचा किती अभिमान आहे…तुम्हाला एवढा स्वतःचा जातीचा अभिमान आहे, तर मग इतरांना का असू नये?” या नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेवर उत्तर देत केतकी म्हणाली, “मराठा जातीच्या विरोधात मी नाही. तुम्ही कितीही मला तसे रंगवायचा प्रयत्न केलात तरी मी तशी होत नाही. तुम्ही रंगवत राहा काल्पनिक कथा. मी मनोरंजन म्हणून वाचत राहते. सत्य खऱ्या मराठाला माहिती आहे की मराठा व ब्राह्मण हे १९९० पर्यंत एकच होते. कुणी तेढ निर्माण केली हे ही सर्वांना महिती आहे. आता मराठा समाजात कोण तेढ निर्माण करतंय हे ही सर्वांना माहिती आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्या गटातील आहात, ते दाखवून दिल्याबद्दल तुमचे आभार.”
हेही वाचा – वैजयंती माला यांना पद्म विभूषण जाहीर झाल्यावर हेमा मालिनी यांची खास पोस्ट, म्हणाल्या, “माझ्यासाठी हा दिवस…”
दरम्यान, केतकीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘स्टार प्रवाह’वरील ‘आंबट गोड’, ‘झी मराठी’वरील ‘तुझं माझं ब्रेकअप’ या लोकप्रिय मालिकांमध्ये केतकीनं काम केलं होतं. शिवाय तिनं हिंदीमधील ‘सोनी टीव्ही’वरील ‘सास बिना सुसराल’ या मालिकेतही काम केलं होतं.