‘मुरांबा’ (Muramaba) मालिकेने नुकताच १००० भागांचा टप्पा पार केला. या मालिकेत सध्या माही व रमा या हुबेहूब दिसणाऱ्या मुली प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहेत. काही दिवसांपूर्वी रमाचा अपघात झाला होता. त्यानंतर रमा सापडत नव्हती. घडलेल्या प्रकारामुळे अक्षयला बरे वाटत नव्हते. त्यामुळे त्याच्या आईला सीमाला त्याची काळजी वाटत होती. यादरम्यानच तिची भेट माहीशी झाली, जी अगदी रमासारखी दिसत होती. माहीने रमाची जागा घ्यावी आणि अक्षयच्या आयुष्यात यावे, मुकादमांच्या घरी राहावे, अशी सीमाने तिला विनंती केली. या सगळ्यात माही सुरुवातीला नाखुशीने सहभागी झाली. त्यानंतर तिला समजले की, रमाचा अपघात तिच्या कारनेच झाला आहे. मग तिने सीमाची अट मान्य करीत अक्षयची पत्नी म्हणून ती राहू लागली.
दुसरीकडे पाहायला मिळाले की, रमा या अपघातातून वाचली. सुरुवातीला तिला तिच्याविषयी काही आठवत नव्हते. हळूहळू ती या अपघातातून सावरली. अक्षय तिचा पती असल्याचे तिला समजले. मात्र, त्यानंतर तिने माहीला अक्षयबरोबर पाहिले. तिचा असा समज झाला की, अक्षयने दुसरे लग्न केले आहे. या सगळ्यात रमाला माहीच्या सावत्र आई आणि तिचा बॉयफ्रेंड नीलने किडनॅप केले. त्यानंतर रमा व माहीची भेटही झाली. तेव्हा रमाला समजले की, अक्षयने दुसरे लग्न केले नसून तिच्यासारख्या हुबेहूब दिसणाऱ्या मुलीला तो रमा समजत आहे. मात्र, त्यानंतरही रमा व अक्षयची भेट झाली नसल्याचे पाहायला मिळाले. आता अखेरीस रमा व अक्षय यांची भेट होणार आहे. विशेष म्हणजे ही भेट माहीने घडवून आणल्याचे दिसत आहे.
अखेर रमा-अक्षयची भेट होणार…
स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर मुरांबा या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, माही रमाकडे आली आहे. ती रमाला म्हणते की, मला तुला छान तयार करायचे आहे. अक्षय तुझ्याकडे बघत राहिला पाहिजे. त्यानंतर रमा लाल रंगाची साडी नेसून तयार झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर ती अक्षयला भेटण्यासाठी गेली आहे. ती मनातल्या मनात म्हणते की, अहो मी आलीये. तुमची खरी रमा आली आहे. जेव्हा ती अक्षयला भेटण्यासाठी जाते तेव्हा त्या गेटला कुलूप लावल्याचे दिसते. गेटला कुलूप लावलेले पाहिल्यानंतर ती त्या गेटवर चढून अक्षयला भेटण्यासाठी जाते. ती अक्षयकडे पळत जाते आणि त्याला मिठी मारते. त्यानंतर दोघेही एकमेकांना मिठी मारून रडत असल्याचे दिसते. अक्षय तिला म्हणतो, “तुझ्या मिठीत असूनसुद्धा डोळ्यांतील आनंदाश्रू थांबतच नाहीयेत”. त्यावर रमा म्हणते, “कारण- तुमच्या हृदयाला समजलंय की, तुमची खरी रमा मी आहे”.
हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने, ‘अखेर रमा-अक्षयची भेट होणार’, अशी कॅप्शन दिली. आता मालिकेत पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. माही पुढे काय कऱणार, अक्षयला रमा व माहीमधील फरक कधी कळणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.