‘मुरांबा'(Muramba) ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत शिवानी मुंढेकर व अभिनेता शशांक केतकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. शशांकने या मालिकेत अक्षय ही भूमिका साकारली आहे. तर शिवानीने रमा व माही अशी दुहेरी भूमिका साकारल्याचे पाहायला मिळत आहे. मालिकेतील कलाकारांचा सहज अभिनय व येणारे ट्विस्ट यामुळे प्रेक्षकांची ही लाडकी मालिका आहे. आता काही दिवसांपासून माहीने रमाचे रुप घेतले आहे व ती रमा म्हणून मुकादमांच्या घरी राहत आहे. अक्षयची प्रकृती बरी व्हावी, यासाठी त्याची आई सीमाची योजना आहे. आता मात्र, माही असे काही करणार आहे, ज्यामुळे ती रमा नाही, अशा अक्षयला संशय येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर ‘मुरांबा’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अक्षय व रमाच्या रुपातील माही मंदिरात गेल्याचे दिसत आहे. मंदिरातून बाहेर येताना माही त्याला म्हणते, दर्शन छान झालं. तितक्यात अक्षयला चक्कर येते. माही त्याला म्हणते, ” तुम्हाला काय होतंय?”, त्यावर अक्षय म्हणतो, “मला ना जरा गरगरतंय”, त्यावर माही त्याला कारजवळ नेते व त्याला गाडीमध्ये बसवत म्हणते, तुम्ही बसा, तुम्हाला दवाखान्यात न्यायला पाहिजे. असे म्हणून ती त्याला गाडीत बसवते आणि स्वत: कार चालवायला सुरूवात करते. हे पाहताच अक्षय तिला म्हणतो, “रमा तू गाडी चालवायला केव्हा शिकलीस?”, अक्षयने अचानक विचारलेल्या प्रश्नावर माही काय असे म्हणते. त्यानंतर अक्षय मनातल्या मनात म्हणतो, “ही रमाच आहे की दुसरी कोणी?”
हा प्रोमो शेअर करताना, “अक्षयला येणार ही मुलगी रमा नसल्याचा संशय…”, अशी कॅप्शन दिली आहे.
‘मुरांबा’ मालिकेत दाखविल्याप्रमाणे, माही चालवत असलेल्या गाडीने रमाला धडक दिली होती. त्यावेळी रमा दरीत पडली होती. त्यानंतर रमाचा शोध लागला नाही. रमाचा अशा अपघातामुळे अक्षयच्या प्रकृती बिघडली होती. रमा व माही एकसारख्या दिसतात. याचाच फायदा घेत सीमाने अक्षयच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी माहीला रमाचे रूप घेऊन मुकादमांच्या घरात राहण्याची विनंती केली होती. ज्यावेळी माहीला समजते की रमाचा अपघात तिच्यामुळेच झाला आहे, त्यावेळी ती रमाचे रुप घेण्यास तयार झाली.
आता अक्षयला त्याच्याबरोबर असणारी मुलगी रमा नसल्याची जाणीव होणार का, माहीचे सत्या त्याला समजणार का, मालिकेत पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.