मालिकेतील ट्विस्ट प्रेक्षकांची उत्सुकता वाढवताना दिसतात. पुढच्या भागात काय होईल, नेमकं काय घडेल, अशी उत्सुकता प्रेक्षकांना कायमच त्यांच्या आवडत्या मालिकेबाबत असल्याचे पाहायला मिळते. आता लोकप्रिय मालिकांपैकी एक अशा ‘मुरांबा'(Muramba) मालिकेत मोठा ट्विस्ट येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. ‘मुरांबा’ मालिकेत सध्या विविध गोष्टी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. अक्षयच्या आयुष्यात मोठे चढ-उतार येत असल्याचे दिसत आहे. नुकताच रमाचा अपघात झाला. त्यानंतर तिचे निधन झाल्याचे सर्वांना वाटत आहे. मात्र, अक्षयला रमा जिवंत असून ती परत त्याच्या आयुष्यात येईल,असा विश्वास आहे. आता मुकादम कुटुंबात माहीची एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळत आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये माही व अक्षय समोरासमोर येण्याची शक्यता असल्याचे दिसत आहे.
माही व अक्षय समोरासमोर येणार का?
स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर मुरांबा या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. ज्यामध्ये माही मुकादमांच्या घरी राहायला आली असल्याचे दिसत आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, सीमा माहीला म्हणते की मी तुला याआधीसुद्धा सांगितलं होतं. अक्षयच्या समोर तोपर्यंत यायचं नाही, जोपर्यंत तू रमा म्हणून तयार होत नाहीस. माही अक्षयच्या आजीच्या खोलीत आहे. अक्षय तिथे येतो व त्याच्या आजीला हाक मारतो. त्याचा आवाज ऐकताच माही कपाटाच्या बाजूला लपते. अक्षय खोलीत आल्यानंतर तिथे आजी नसल्याचे पाहायला कळते. कुठे गेली आजी असे स्वत:शीच म्हणत तो बाहेर जायलाच निघतो, तितक्यात माहीच्या हातातील वस्तू खाली पडते. त्याच्या आवाजाने तो थांबतो. व तो माही लपलेल्या ठिकाणाच्या दिशेने जात असल्याचे दिसत आहे.
हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने, “अक्षयला कळेल का माहीचं सत्य?”, अशी कॅप्शन दिली आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे मुकादम कुटुंबात रमा सून म्हणून आल्यानंतर सुरूवातीला तिला कोणीही स्विकारले नव्हते. मात्र, हळूहळू रमाने तिच्या स्वभावाने सर्वांचे मन जिंकले. अक्षय-रमा एकमेकांच्या प्रेमात पडले. या सगळ्यात रेवाने त्यांना खूपदा त्रास दिला. रमा-अक्षयला एकत्र येऊ न देता अक्षयबरोबर लग्न करण्याचा तिने प्लॅन केला. मात्र, रमा-अक्षयने कायम एकमेकांना साथ दिली व प्रत्येक संकटावर मात केली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी रेवाचे सत्य सर्वांसमोर आणले. रेवाने आरतीला मारण्याची सुपारी दिली होती व तिच्यामुळेच आरतीने जीव गमावला, याबरोबच अक्षयला मारण्याचादेखील प्रयत्न केला. तिचे सत्य सर्वांसमोर आणून तिला तुरूंगात पाठवले आहे. त्यानंतर रमा-अक्षय फिरायला गेल्यानंतर रमाचा अपघात झाला. तीला एका गाडीने धडक दिली व ती पुलावरून खाली पडली. ती सापडली नाही. याचदरम्यान, रमासारखीच हुबेहूब दिसणारी एक मुलगी आली. तीचे नाव माही आहे. आता अक्षयला रमाच्या धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी माहीला रमा बनवायचे, असे अक्षयच्या आईने म्हणजेच सीमाने ठरवले आहे.
आता माही रमाचे रूप घेऊ शकणार का, अक्षय तिला रमा म्हणून स्वीकारू शकणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.