मुरांबा (Muramba) ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील रमा-अक्षयची जोडी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करताना दिसते. या जोडीला प्रेक्षकांचेही भरभरून प्रेम मिळत असल्याचे पाहायला मिळते. आता मात्र रमा-अक्षय पुन्हा एकदा एकमेकांपासून दुरावणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री
स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर ‘मुरांबा’ मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, अक्षय व रमा एका रस्त्यावर आहेत. ते एकमेकांकडे येत आहेत. अक्षयच्या हातात फुले दिसत असून, दोघेही आनंदात असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, तितक्यात रमाच्या पाठीमागून एक गाडी वेगाने येते आणि ती रमाला धडक देते. रमा त्या गाडीच्या धक्क्याने हवेत उडते. अक्षय हे पाहताच तिला वाचवण्यासाठी जातो; मात्र रमा तोपर्यंत पुलाखाली पडते. हे सर्व पाहिल्यानंतर रमा, असे म्हणत अक्षय तिथेच बेशुद्ध पडलेला दिसत आहे. या सगळ्यात रमाला धडक मारलेली गाडी पुढे जाऊन थांबते. त्यातून एक मुलगा व एक मुलगी खाली उतरतात. ते रमाचा अपघात झालेल्या ठिकाणी येतात. ही मुलगी हुबेहूब रमासारखी दिसत असून, तिचा पेहराव मात्र वेगळा दिसत आहे. ती मुलगी व तिच्याबरोबर असलेला मुलगा दोघेही घाबरल्याचे दिसत आहेत.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “रमा-अक्षयच्या आयुष्यात आलेली ही माही काय वळण देईल त्यांच्या नात्याला…?”, अशी कॅप्शन दिली आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, अनेक दिवसांपासून रेवाचे सत्य सर्वांसमोर आणण्यासाठी अक्षयने गेल्या दोन वर्षांतले काही आठवत नसल्याचे नाटक केले होते. त्यामुळे त्याला त्याची पत्नी रमापासून दूर राहावे लागले होते. अखेरीस रमाच्या मदतीने अक्षयने रेवाचे सत्य सर्वांसमोर आणले आणि तिला पोलिसांच्या ताब्यात दिले. आता रमा-अक्षय अनेक दिवसांनी एकत्र आले असल्याचे पाहायला मिळत होते आणि ते एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करताना दिसत होते. आता रमासारखीच हुबेहूब दिसणारी माही ही मुलगी आयुष्यात येण्याने रमा-अक्षयच्या आयुष्यात काय बदल होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, मालिकेत शिवानी मुंढेकरबरोबर दिसणारा मुलगा अभिनेता रोहन गुजर आहे. रोहन गुजरची ‘मुरांबा’ मालिकेत एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळत आहे. या मालिकेत अक्षयची भूमिका साकारणारा अभिनेता शशांक केतकर व रोहन गुजर यांनी याआधी ‘होणार सून मी या घरची’ मालिकेत एकत्र काम केले आहे. आता या मालिकेत रोहनची नेमकी भूमिका काय असणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd