‘मुरांबा'(Muramba) या मालिकेतील अक्षय गेल्या काही दिवसांपासून दु:खी असल्याचे दिसत आहे. त्याच्या पत्नीचा रमाचा त्याच्यासमोर अपघात झाला. एका गाडीने तिला उडवले व ती हवेत उडून पुलाखाली पडली. त्यानंतर ती सापडली नाही. रमाचा अपघात पाहिल्यानंतर त्याचा अक्षयवर वाईट परिणाम झाला. घरातील सर्व रमाचे निधन झाले आहे, असे समजत असले तरी अक्षयचा विश्वास आहे की रमा परत येईल. तो तिची वाट पाहत आहे. दुसरीकडे रमासारखी दिसणारी मात्र मॉडर्न असणारी माही नावाची मुलगी मुकादम कुटुंबात आली आहे. माहीच्याच गाडीने रमाला उडवले होते. सीमाला ही माही दिसते. ती रमासारखी दिसत असल्याने सुरूवातीला तिला आश्चर्य वाटते. मात्र, ती रमा नसून माही असल्याचे समजताच सीमा तीची मदत अक्षयला बरे करण्यासाठी माहीची मदत घ्यायची ठरवते. आता मात्र समोर आलेल्या प्रोमोमध्ये माहीमुळे अक्षयचा जीव वाचणार असून त्याला जगण्याची नवी उमेद मिळणार असल्याचे दिसत आहे.
अक्षयला माहीमुळे मिळणार जगण्याची नवी उमेद
स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर मुरांबा मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, अक्षय अत्यंत निराश असून तो रस्त्यावरून चालत आहे. तो मनातल्या मनात म्हणतो, “रमा तू नसशील तर मीसुद्धा जगणार नाही”, असे म्हणत तो एका ट्रकच्या समोर जातो. मात्र तितक्यात त्याला कोणीतरी बाजूला ओढून घेते. ती माही असते. माही अक्षयला समजावून सांगते की, आयुष्य सुंदर आहे. तू जे या विश्वाकडे मागशील ते तुला देईल. नवीन वर्षाच्या शुभेच्छा! असे म्हणून माही निघून जाते. अक्षयबरोबर बोलताना तिच्या चेहऱ्यावर मास्क असल्याचे दिसते. अक्षय मनातल्या मनात म्हणतो की मला जे हवंय ते मिळणार असेल तर मला माझी रमा हवी आहे.
हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने, “माहीमुळे अक्षयला मिळणार जगण्याची नवी उमेद…”, अशी कॅप्शन दिली आहे.
मुरांबा मधील रमा-अक्षयची जोडी प्रेक्षकांची अत्यंत लाडकी आहे. दोन वेण्या घालणारी, कमी शिकलेली, साधे राहणीमान असलेली अशी रमा वेळप्रसंगी सर्व संकटांवर मात करण्याची हिंमत ठेवणारी, धाडसी व व्यवहारदक्ष प्रेक्षकांचे लाडके पात्र आहे. याबरोबरच, उच्चशिक्षित, श्रीमंत कुटुंबात वाढलेला अक्षय या दोघांच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. रेवाने अनेकदा त्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला मात्र तिला कायम अपयश मिळाले. तिचे कारस्थान सर्वांसमोर उघड जेव्हा तिला तुरूंगात पाठवले व रमा-अक्षयचा सुखाचा संसार झाला. तितक्यात रमाचा अपघात झाला आणि अक्षयच्या आयुष्यात नवीन वळण आले.
आता माहीच्या येण्याने अक्षयच्या आयुष्यात काय नवीन बदल होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.