‘मुरांबा'(Muramba) मालिकेत सतत येणारे ट्विस्ट आणि अक्षय-रमाची जोडी यामुळे ही मालिका प्रेक्षकांची लाडकी आहे. विशेषत: रमा-अक्षयच्या जोडीवर प्रेक्षकांचे प्रेम असल्याचे दिसते. मात्र, काही दिवसांपूर्वीच रमाचा अपघात झाल्याचे पाहायला मिळाले. अपघात झाल्यानंतर ती सापडली नाही. त्यानंतर अक्षय आजारी पडल्याचे पाहायला मिळाले. या सगळ्यात ज्या गाडीने रमाला उडवले ती गाडी एक मुलगी चालवत होती. ती जेव्हा गाडीतून उतरली तेव्हा हुबेहुब रमासारखीच दिसणारी मुलगी असल्याचे दिसले. मॉडर्न लूकमध्ये दिसणाऱ्या या मुलीचे नाव माही असल्याचे समोर आले. सध्या माही मुकादमांच्या घरी असल्याचे पाहायला मिळत आहे. आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये सीमा माहीला रमा बनवण्याचा विचार करत असल्याचे दिसत आहे.
अक्षयसाठी मॉडर्न माही रमा बनणार का?
स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर मुरांबा मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, माही मुकादमांच्या घरी आहे. ती खात असल्याचे दिसत आहे. तिथेच बसलेली अक्षयची आई नैनाला म्हणते, “अक्षयला जर बरं करायचं असेल तर हिला रमा बनवावच लागेल.” नैना म्हणते, “काकू हिला रमा बनवणं अवघड आहे.” यावर सीमा म्हणते, “अवघड आहे पण अशक्य नाही.”
हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने, “माहीला रमा बनवण्याचा सीमाचा प्रयत्न होईल का यशस्वी…?”, अशी कॅप्शन दिली आहे.
मालिकेत रमा-रेवाची मैत्री सुरुवातीला पाहायला मिळाली. मात्र, त्यानंतर त्यांच्या मैत्रीत कडवटपणा आलेला दिसला. रमा-अक्षयच्या जोडीने प्रेक्षकांचे मन जिंकले. अनेकदा त्यांना संकटांचा सामना करावा लागला. मात्र, प्रत्येक वेळी त्यांनी एकत्र त्याचा सामना केला. नुकतेच मालिकेत पाहायला मिळाले की, रेवाचे सत्य त्यांनी सर्वांसमोर आणले व तिला पोलिसांच्या ताब्यात दिले. गेले अनेक दिवस ते रेवाचे सत्य समोर आणण्यासाठी प्रयत्न करत होते. आता अनेक संकटांवर मात करित अनेक दिवसानंतर ते एकत्र आले होते. मात्र, तितक्यात रमाचा अपघात झाला.
हेही वाचा: Year Ender 2024: यंदा बॉलीवूडच्या कोण-कोणत्या सेलिब्रिटींच्या घरी पाळणा हलला, जाणून घ्या…
आता रमासारखीच दिसणारी ही माही कोण आहे, रमाचे पुढे काय होणार, अक्षय कधी बरा होणार, माहीला रमा बनण्याचा सीमाचा प्रयत्न यशस्वी होणार का, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.