रमा-अक्षय हे जोडपे प्रेक्षकांचे अत्यंत लाडक्या जोडप्यांपैकी एक आहे. ‘मुरांबा’ (Muramba) मालिकेतील या जोडीने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रमा व अक्षय हे एकमेकांपासून वेगळे झाल्याचे दिसत आहे. रमाचा अपघात होऊन ती दरीत पडली. अक्षयला ती सापडली नाही. इतर सर्व जण रमाचे निधन झाले असे म्हणत असले तरी ती जिवंत असल्याचा अक्षयला विश्वास आहे. अक्षयच्या प्रकृतीवर या सर्वाचा परिणाम झाला आहे. या सगळ्यात ज्या गाडीने रमाला धडक दिली, ती गाडी माही नावाची मुलगी चालवत होती व ही मुलगी हुबेहूब रमासारखी दिसते. माहीला पाहिल्यानंतर ती रमा बनून अक्षयला बरे करण्यास मदत करू शकते, असे अक्षयच्या आईला म्हणजेच सीमाला वाटते; यामुळे माहीला ती तिचा प्लॅन सांगते. आता ‘मुरांबा’ मालिकेचा एक प्रोमो समोर आला असून माही रमा बनण्यास तयार होणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
आजपासून मी तुमच्या अक्षयची रमा…
स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर ‘मुरांबा’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये सीमा माहीला रमाचा जिथे अपघात झाला होता, तिथे घेऊन आल्याचे दिसत आहे. सीमा रमाला म्हणते, “तुला व्हायचं नाही ना रमा? जायचंय ना तुला? जा बघ ती जागा. इथे माझ्या रमाला एका गाडीने उडवलं आणि ती या दरीत पडली.” सीमा हे सांगत असताना माही घाबरलेली दिसते. माही मनातल्या मनात म्हणते की, रमाच्या जाण्याला मी जबाबदार आहे? सीमा तिला माही अशी हाक मारते. ते ऐकताच माही वळून मागे पाहते व म्हणते, “माही नाही रमा. आजपासून मी तुमच्या अक्षयची रमा.” त्याचवेळी रमा अक्षय अशी हाक मारत अचानक झोपेतून उठल्याचे पाहायला मिळत आहे. रमाच्या डोक्याला पट्टी बांधली असून तिच्या चेहऱ्यावर जखमा दिसत आहेत.
हा प्रोमो शेअर करताना, स्टार प्रवाह वाहिनीने, “माही होणार अक्षयची रमा…”, अशी कॅप्शन दिली आहे.
‘मुरांबा’ मालिकेचा प्रोमो पाहिल्यानंतर अक्षयचा विश्वास खरा ठरल्याचे दिसत आहे. रमा जिवंत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता मात्र माहीच्या निर्णयामुळे अक्षय-रमाच्या आयुष्यात काय बदल होणार, रमा अक्षयपर्यंत कशी पोहोचणार, रमाच्या रूपातील माहीला पाहिल्यानंतर अक्षयची प्रतिक्रिया काय असणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.