‘मुरांबा’ (Muramba) या मालिकेत रमा व माही यांच्यामुळे सध्या ट्विस्ट आल्याचे दिसत आहे. रमा व माही अगदी हुबेहूब दिसत आहेत. तसेच रमाचा अपघात झाल्यानंतर माही अक्षयच्या आईच्या म्हणजेच सीमाच्या सांगण्यावरून मुकादम यांच्या कुटुंबाचा एक भाग झाली. ती अगदी रमासारखीच दिसत असल्याने अक्षयलाही ती रमाच असल्याचा विश्वास बसला. सुरुवातीला रमाचा अपघात केल्याच्या अपराधीपणाच्या भावनेतून माही अक्षयच्या आयुष्यात आली होती. तो बरा व्हावा, यासाठी ती मुकादम यांच्या कुटुंबात आली. मात्र, आता ती अक्षयच्या प्रेमात पडली आहे. दुसरीकडे रमादेखील अपघातातून सावरली आहे. मात्र, तिला माहीचा बॉयफ्रेंड नील व तिची सावत्र आई यांनी त्यांच्या फायद्यासाठी घरात कैद करून ठेवले आहे. तसेच, अक्षयने दुसरे लग्न केले, असा रमाचा गैरसमज झाला आहे. मात्र, ती मुलगी कोण हे मात्र तिला माहीत नाही. आता रमा व माही एकमेकींसमोर येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
स्टार प्रवाह वाहिनीने मुरांबा या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, रमाला एका अंधाऱ्या खोलीत दोरीने बांधून ठेवले आहे. ती रडत रडत देवाकडे प्रार्थना करते. रमा म्हणते, “बाप्पा मला यांच्याकडे जायचं आहे. सगळे मार्ग बंद झालेत. आता तूच काहीतरी मार्ग दाखव.” तितक्यात खोलीची काच तोडून कोणीतरी आत येते. त्या व्यक्तीने चेहऱ्यावर मास्क लावलेला दिसत असून, ती व्यक्ती रमाला सोडवते. प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून माही आहे. माही चेहऱ्यावरचा मास्क काढत म्हणते, “जोपर्यंत माही इथे आहे. तोपर्यंत रमाला काही होणार नाही.” माहीला पाहिल्यानंतर रमा आश्चर्यचकित होते. ती म्हणते, “माझ्यासारखी दिसणारी ही कोण आहे?”
हा प्रोमो शेअर करताना, ‘रमा आणि माही येणार समोरासमोर’, अशी कॅप्शन देण्यात आली आहे.
नेटकरी काय म्हणाले?
‘मुरांबा’ मालिकेचा हा प्रोमो पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, “माहीच्या गेटअपमध्ये डॅशिंग दिसते”. दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “नाद खुळा माही”. आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “सीता और गीता”. एका नेटकऱ्याने माहीचे कौतुक करीत लिहिले, “खूप छान काम केलेस माही”. तर, काही नेटकऱ्यांनी हा ट्रॅक लवकर संपवा, असेही लिहिले आहे. “संपवा आता हा विषय कंटाळा आला. आता आम्हाला रमा-अक्षयला एकत्र पाहायचं आहे. गुढीपाडव्याच्या आधी तरी त्या दोघांना एकत्र आणा. निदान अक्षयला एवढं तरी कळू द्या की, त्याच्यासोबत आहे ती रमा नाही”, ” सस्पेन्स लवकर संपवा. सत्य बाहेर येऊद्या. तरच पाहायला बरं वाटेल. त्या रमाला काय काय सहन करावं लागत आहे.” तर काहींनी, माही आता नकारात्मक भूमिकेत दिसेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.




आता माहीच्या सावत्र आईचा व तिच्या बॉयफ्रेंडचा काय प्लॅन आहे, तसेच माहीने रमाला का वाचवले याबरोबरच अक्षयमुळे माही व रमा एकमेकींविरुद्ध उभ्या राहणार का, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.