छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध बालकलाकार मायरा वायकुळ ही लवकरच एका हिंदी मालिकेत झळकणार आहे. ‘नीरजा- एक नई पहचान’ असं तिच्या नव्या मालिकेचे नाव आहे. सध्या या मालिकेचे शूटींग सुरु आहे. मात्र आता या मालिकेच्या सेटवर बिबट्या घुसल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे सेटवरील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
‘नीरजा- एक नई पहचान’ या मालिकेचे शूटींग गोरेगाव फिल्मसिटीमध्ये सुरु आहे. या ठिकाणी अनेकदा वन्य प्राणी दिसत असल्याचे वृत्त याआधीही समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘नीरजा- एक नई पहचान’ या मालिकेचा एक कार्यक्रम गोरेगावमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी या मालिकेचे सर्व कलाकार आणि क्रू मेंबर्स उपस्थित होते.
आणखी वाचा : “प्रथमेश लघाटेने प्रपोज केल्यानंतर होकार देण्यासाठी तीन दिवस का घेतले?” मुग्धा म्हणाली, “कारण मला…”
या मालिकेसाठी उभारण्यात आलेल्या घराच्या छतावर अनेक माकडे पावसामुळे लपून बसले होते. त्यावेळी अचानक एका बिबट्याने माकडांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने छतावर झडप घातली. मात्र तिथे गर्दी पाहून त्याने पळ काढला. पण बिबट्याचा सेटवरील वावर पाहता सेटवरील कलाकारांची तारांबळ उडाली. या बिबट्याचा एक व्हिडीओही समोर आला आहे.
आणखी वाचा : “सध्या दोन अजितदादा चर्चेत आहेत, एक पवारांचे आणि दुसरे…”, केदार शिंदेंच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष
दरम्यान ‘नीरजा- एक नई पहचान’ ही मालिका येत्या १० जुलैपासून कलर्स वाहिनीवर प्रदर्शित केली जाणार आहे. या मालिकेत अभिनेत्री स्नेहा वाघ, काम्या पंजाबी झळकणार आहे. त्याबरोबरच या मालिकेत बालकलाकार मायरा वायकुळही दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेचे प्रोमोही समोर आले होते. याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.