अभिनयक्षेत्रात कास्टिंग काउच हा प्रकार नवीन नाही. अनेक अभिनेते व अभिनेत्रींना कास्टिंग काउचचा सामना करावा लागतो. त्यात ते कलाकार जर या क्षेत्रात नवीन असतील, अभिनय क्षेत्रातील कौटुंबीक पार्श्वभूमी नसेल तर त्यांना या गोष्टींचा जास्त सामना करावा लागतो. आता एका टीव्ही अभिनेत्याने त्याचा कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव शेअर केला आहे.
टीव्ही शो ‘नागिन’ फेम अभिनेता लोकेश बट्टा याने एक भयानक अनुभव सर्वांशी शेअर केला आहे. लोकेश बट्टाने ‘स्पॉटबॉय’ला दिलेल्या मुलाखतीत त्याच्यासोबत घडलेल्या या घटनेचा उल्लेख केला आहे. “मी माझ्या करिअरमध्ये खूप संघर्ष केला पण कधीही हार मानली नाही. कलाकारांना इंडस्ट्रीत खूप संघर्ष करावा लागतो. मग तो कास्टिंग काउच असो वा पक्षपात. मी देखील याचा सामना केला आहे. इंडस्ट्रीतील अनेक लोकांनी मला कास्टिंग काउचच्या ऑफर्स दिल्या. पण मी कधीही कठोर परिश्रम करण्यापासून मागे हटलो नाही आणि कधीही हार मानली नाही. त्यावेळी मी फक्त स्वतःला म्हणायचो की एक दिवस माझी वेळ नक्कीच येईल. पण खेदाची गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टी अभिनेत्रींबरोबरही खूप घडतात आणि त्या कुणाबरोबरही घडू शकतं. अशा परिस्थितीत अनेकांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो,” असं लोकेश बट्टा म्हणाला.
लोकेश बट्टाने प्रसिद्ध शो ‘उडारियां’मध्ये नकारात्मक भूमिका साकारली होती. या मालिकेतून तो लोकप्रिय झाला, पण नंतर त्याने ‘नागिन’ मालिकेत सकारात्मक भूमिका साकारली होती. यामध्ये तो तेजस्वी प्रकाशला तिच्या शत्रूंशी लढण्यासाठी मदत करतो.