हार्दिक जोशी व अक्षया देवधरची सध्या लगीन घाई सुरु आहे. येत्या एक ते दोन दिवसांमध्ये छोट्या पडद्यावरील हे सुप्रसिद्ध जोडपं विवाहबंधनात अडकणार आहे, पण त्यापूर्वी आणखी एक मराठी अभिनेता विवाहबंधनात अडकला आहे. अभिनेता नचिकेत देवस्थळीचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. नचिकेतने अभिनेत्री तन्वी कुलकर्णीसह लग्न केलं आहे. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
झी मराठी वाहिनीवरील ‘ती परत आलीये’ या मालिकेमध्ये नचिकेतने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या मालिकेमधील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. २९ नोव्हेंबरला नचिकेत व तन्वीचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला.
या दोघांच्या विवाहसोहळ्या काही मराठी कलाकार मंडळींनीही हजेरी लावली होती. नचिकेत व तन्वीच्या मित्र परिवाराने त्यांच्या लग्नाचे काही फोटो व व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
अगदी पारंपरिक पद्धतीने नचिकेत व तन्वीचा विवाहसोहळा पार पडला. तन्वीने लग्नविधींसाठी पिवळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती. तर रिसेप्शनसाठी खास निळ्या रंगाची साडी परिधान केली होती. तर नचिकेतनेही शेरवानी परिधान करणं पसंत केलं. या दोघांवर त्यांचे चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.