इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी काही महिन्यांपूर्वी एक वक्तव्य केले होते. ज्यामुळे बराच वाद झाला. भारतीय तरुणांना त्यांनी आठवड्याला ७० तास काम करण्याचा सल्ला दिला होता. इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये मूर्ती यांनी त्यांच्या आयुष्यातील चढ-उतार आणि व्यावसायिक वाटचालीबाबत भाष्य केले. यावेळी त्यांनी सांगितले की, इन्फोसिसची स्थापना करताना ते तासनतास कामात गुंतलेले असायचे. “१९९४ पर्यंत मी आठवड्याला ८५ ते ९० तास काम करायचो”, असे ते या मुलाखतीत म्हणाले होते.
नारायण मूर्ती यांच्या या वक्तव्यामुळे चांगलाच गदारोळ झाला होता. बऱ्याच लोकांनी नारायण मूर्ती यांचं हे वक्तव्य किती विचित्र आणि हास्यास्पद आहे हे पटवून दिलं. तर कित्येकांनी नारायण मूर्ती यांनी घेतलेल्या मेहनतीचे दाखले दिले. उद्योजक म्हंटलं की कामाची निश्चित वेळ ठरवणं शक्य नसल्याने हे उद्योगपतींना सहज शक्य आहे पण नोकरवर्गाला आठवड्याला इतके तास काम करणं शक्य नाही असा सूरही आपल्याला यावेळी ऐकायला मिळाला. आता याबद्दल ‘शार्क टँक इंडिया’फेम एमक्युअर फार्माची सीईओ नमिता थापर हिने भाष्य केलं आहे.
आणखी वाचा : अरबाज व शुराचा रोमॅंटिक अंदाजातील ‘तो’ फोटो चर्चेत; नेटकरी म्हणाले, “याला म्हातारचळ…”
नुकताच ‘शार्क टँक इंडिया’चा तिसरा सीझन भेटीला आला आहे. इतर दोन सीझनप्रमाणेच यालाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. यावेळच्या सीझनमध्ये ‘आस्क द शार्क’ या राऊंडमध्ये प्रेक्षक आपल्या लाडक्या शार्कला कोणताही एक प्रश्न विचारू शकतात व शार्क त्याचं उत्तर देतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये एका प्रेक्षकाने नमिताला नारायण मूर्ती यांच्या त्या वक्तव्याबद्दल विचारलं. प्रत्येकाने आठडव्याला ७० ते ८० तास काम करायलावं का? या प्रश्नावर नमिताने उत्तर दिलं.
नमिता म्हणाली, “जर तुम्ही ७० ते ८० तास काम केलंत तर फक्त एका क्षेत्राचा फायदा होईल तो म्हणजे वैद्यकीय क्षेत्राचा. कारण यामुळे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर प्रचंड परिणाम होऊ शकतो. माझ्यामते सध्याच्या आधुनिक काळात तुम्ही ७० ते ८० तास काम करणं योग्य नाही, तुम्ही मन लावून मेहनतीने काम करायला हवं ते जास्त महत्त्वाचं आहे.” आपण किती वेळ काम करतो त्यापेक्षा आपण कसं काम करतो हे जास्त महत्त्वाचं आहे हे नमिताने तिच्या उत्तरातून पटवून द्यायचा प्रयत्न केला आहे.