‘शार्क टॅंक इंडिया’चा पहिलं पर्व खूप गाजलं. त्यानंतर आता नुकतंच या कार्यक्रमाचं दुसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाप्रमाणेच दुसरं पर्वही प्रचंड गाजत आहे. या पर्वात पियुष बन्सल, विनिता सिंग, नमिता थापर, अनुपम मित्तल आणि अमन गुप्ता हे शार्क्सच्या खुर्चीत बसलेले आहेत. या कार्यक्रमात नवीन व्यवसायिकांनी मांडलेल्या बिझनेसच्या कल्पनांमुळे अनेकदा हे परीक्षक भारावून गेलेले दिसले. पण आता एका नव व्यवसायिकामुळे नमिता थापर भावूक झालेली पाहायला मिळली.
या कार्यक्रमात नवीन व्यवसायिक त्यांच्या बिझनेसच्या कल्पना घेऊन जज शार्क्सना सांगतात आणि शार्क्सना जर त्यांच्या व्यवसायात रस वाटलं तर ते त्यांच्या व्यवसायात पैसे गुंतवतात. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये एका नवीन व्यवसायिकाने गर्भाधारणा होण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या IVF प्रणालीशी संबंधित एक उत्पादन ‘शार्क टॅंक इंडिया २’च्या मंचावर आणलं. त्याने दिलेल्या सादरीकरणाने नमिताला तिचा कठीण काळ आठवला. तिनेही मूल होण्यासाठी IVF पद्धतीच्या सहाय्याने प्रयत्न केले होते असं तिने सांगितलं.
ती म्हणाली, “मी वयाच्या २८ व्या वर्षी नैसर्गिक पद्धतीने माझ्या पहिल्या मुलाला जन्म दिला. आम्हाला आणखी एक मूल हवं होतं. त्यानंतर तीन-चार वर्ष आम्ही बाळ होण्यासाठी प्रयत्न करत राहिलो पण आम्हाला अपयश आलं. नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा होत नसल्यामुळे आम्ही IVF पद्धतीने प्रयत्न केले. प्रत्येक ट्रीटमेंट दरम्यान मला २५ इंजक्शनं घ्यावी लागत होती. तो काळ माझ्यासाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कठीण आणि वेदनादायी होता. तेव्हा देखील आमचे दोन प्रयत्न अपयशी ठरले आणि मी माघार घेतली. एका मुलाबरोबर आपण खुश राहायचं असं आम्ही ठरवलं. पण काही महिन्यांनी मी पुन्हा एकदा नैसर्गिक पद्धतीनेच गरोदर झाले आणि माझ्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर जवळपास दहा वर्ष मी याबाबत कधीही भाष्य केलं नाही. तेव्हा याबाबत बोलणं मला थोडं कमीपणाचं वाटायचं. पण काही महिन्यांपूर्वी मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या एका व्हिडीओसाठी याबाबत मोकळेपणाने बोलले.”
पुढे ती म्हणाली, “याबाबत बोलणं खरोखरच गरजेचं आहे असं मला वाटलं कारण सर्वांना कळायला हवं की हा अनुभव मानसिक दृष्ट्या किती वेदनादायी असतो. त्याचबरोबर महिला किंवा पुरुषांनाही असं वाटायला नको की आपल्यात काहीतरी कमी आहे. मानसिक स्वास्थ्यासाठी याबाबत बोलणं खूप गरजेचं आहे.” आता खुळेपणाने केलेल्या भाष्यामुळे सोशल मीडियावरून सर्वजण तिचं कौतुक करत आहेत.